जळगाव – शहरातील कालिंकामाता मंदिर परिसरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत गुरुवारी सकाळी पडलेल्या दरोड्यात रोख रकमेसह किती सोने चोरीस गेले, हे उघड झाले असून सुमारे १७ लाख १० हजार ३७० रुपयांच्या रोकडसह तीन कोटी ६० लाखांचे सोने, भ्रमणध्वनी संच आणि दुचाकी, असा मुद्देमाल चोरण्यात आला आहे. जिल्हाभरात पोलिसांकडून शोध सुरू असला तरी अद्याप चोरट्यांचा सुगावा लागलेला नाही.
हेही वाचा – कापूस दराबाबत लवकरच तोडगा – गिरीश महाजन यांचे आश्वासन
काशीबाई उखाजी कोल्हे विद्यालयानजीक स्टेट बँक ऑफ इंडियाची शाखा आहे. गुरुवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास दोन युवक दुचाकीवरून बँकेत आले. कोयत्यासारख्या शस्त्राच्या धाकाने दोन्ही युवकांनी व्यवस्थापक राहुल महाजन यांच्यासह पाच-सहा कर्मचार्यांना धमकावले. व्यवस्थापक महाजन यांच्या मांडीवर कोयत्याने वारही केले. बँकेतील रोकडसह सोने बॅगमध्ये भरून काही क्षणात त्यांनी पलायन केले. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दरोड्यात सहभागी असलेल्यांचा दुसऱ्या दिवशीही कोणताच तपास लागलेला नाही.