The person who fired in the air during Diwali arrested nashik ysh 95 | Loksatta

नाशिक : दिवाळीत हवेत गोळीबार करणाऱ्यास अटक

ऑक्टोबर २०२२ मध्ये दिवाळीत एका व्यक्तीने रहिवासी भागातील रस्त्यावर पिस्तुलीतून हवेत गोळीबार केला होता.

gun fire
संग्रहित छायाचित्र/लोकसत्ता

नाशिक : दिवाळीत रहिवासी भागात पिस्तुलीतून हवेत गोळीबार करीत फटाक्यांसारख्या आवाजाचा आनंद घेणारा आणि या संपूर्ण घटनाक्रमाचे छायाचित्रण तयार करीत ते समाज माध्यमात प्रसारित केल्याच्या प्रकरणात संशयित आकाश आदक यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शहर गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकच्या पथकाने ही कामगिरी केली.

ऑक्टोबर २०२२ मध्ये दिवाळीत एका व्यक्तीने रहिवासी भागातील रस्त्यावर पिस्तुलीतून हवेत गोळीबार केला होता. गोळीबारातून फटाक्यासारख्या आवाजाचा आनंद घेण्याचा त्याचा प्रयत्न होता. शिवाय याचे छायाचित्रण त्याने समाज माध्यमात टाकले होते. दिवाळीत झालेल्या या प्रकाराची माहिती गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार प्रशांत मरकड यांना नुकतीच मिळाली. त्यानंतर संशयिताच्या शोधासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांनी प्रदीप म्हसदे, प्रवीण वाघमारे, प्रशांत मरकड, नाझिमखान पठाण, आसिफ तांबोळी आदींचे पथक रवाना केले.

हेही वाचा >>> नाशिक : आता युद्धाधारित कामगिरीवर प्रकाश, तोफखाना संग्रहालयाच्या अंतरंगात बदल

या पथकाने सातपूर-गंगापूर जोड रस्त्यावरील ध्रुवनगर भागातून आकाश आदकला (२४) राहत्या घरातून ताब्यात घेतले. दिवाळीत पिस्तुलीतून हवेत गोळीबार करून छायाचित्रण केल्याची कबुली संशयिताने दिली. तपासात हवेत गोळीबारासाठी संशयिताने वापरलेले दीड लाख रुपयांचे पिस्तुल हस्तगत करण्यात आले. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात शस्त्र कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, उपायुक्त (गुन्हे व विशेष शाखा) प्रशांत बच्छाव, सहायक पोलीस आयुक्त वसंत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने ही कामगिरी केली.

मराठीतील सर्व नाशिक / उत्तर महाराष्ट्र ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-02-2023 at 10:15 IST
Next Story
नाशिक : आता युद्धाधारित कामगिरीवर प्रकाश, तोफखाना संग्रहालयाच्या अंतरंगात बदल