खड्डय़ांमुळे मोसम पुलाची दुर्दशा

मालेगाव शहरातील मध्य भागातील मोसम पूल मालेगांव मध्य आणि बाह्य भागास जोडणारा महत्त्वाचा पूल आहे.

अपघातांचे प्रमाण वाढले, वाहनतालकांची कसरत

नाशिक : मालेगाव शहरातील मध्य भागातील मोसम पूल मालेगांव मध्य आणि बाह्य भागास जोडणारा महत्त्वाचा पूल आहे. शहरातील जवळपास दोन ते अडीच लाख लोकांचा रोजचा वापर या पुलावरून होतो. तालुक्यातील ४० ते ४५ खेड्यातील नागरिकांचाही वावर या पुलावरुन होतो. जळगांव, धुळे, नंदुरबार, शहादा, इंदूर, गुजरात, नाशिक, मुंबई, पुणेकडे जा-ये करणाऱ्या बसगाड्याही याच पुलावरुन जात असतात. अशा या महत्वपूर्ण पुलाची खड्ड्यांमुळे दुर्देशा झाली आहे.

मालेगांव मध्यमधील बस स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पूल ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत जागोजागी खड्डे पडले आहेत. पावसामुळे या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नसून त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. तसेच लोकांना हाडांची दुखणी मागे लागली आहेत. या पुलावरून जातांना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. दुचाकीस्वार आणि रिक्षाचालक जेरीस आले असून मनपा कधी जागी होईल असा प्रश्न उपस्थित होत आहे.

या पुलावरून जातांना खड्डे टाळण्याच्या नादात दुचाकीस्वार, रिक्षा चालक यांचा तोल जाऊन ते नदीत पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. नदीत मोठ्या प्रमाणात दगड धोंडे असून कोणी पडल्यास प्राण जाण्याची अथवा गंभीर दुखापत होण्याची दाट शक्यता आहे. मालेगांव महापालिकेचे अद्यााप या समस्येकडे लक्ष वेधलेले नाही. अपघात झाल्यानंतर पालिकेला जाग येईल काय, असा प्रश्न  विचारला जात आहे. वाहतूक कोंडीची समस्या वाढली असून खड्डे टाळण्याच्या नादात दुसऱ्या गाडीस धक्का लागून भांडणात पर्यावसान होत आहे.

शहरातील सर्वात जुना आणि सततची रहदारी असलेला पूल वाहनचालकांसाठी मृत्यूचा सापळा बनला आहे. महापालिकेत जागरूक अधिकारी आणि नगरसेवकांचा अभाव दिसून येत आहे. महापालिका प्रशासनाने मोसम पुलाची त्वरीत दुरुस्ती करावी, अशी मागणी नागिरकांकडून केली जात आहे.  याविषयी शिक्षक प्रदीप अहिरे यांनी म्हणणे मांडले आहे.

पुलाची अवस्था अतिशय वाईट असून स्थानक ते देवीच्या मळ्यापर्यंत रस्त्याची चाळण झाली आहे. दररोज कामानिमित्त ये-जा करावी लागत असल्याने अंगदुखी मागे लागली आहे. वाहन चालवितांना कसरत करावी लागत आहे .मनपाने लवकरात लवकर रस्ता आणि पूल दुरुस्त करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: The plight seasonal bridge due potholes ssh

ताज्या बातम्या