जळगाव – मुक्ताईनगर येथील पोलिसांनी सातोड शिवारातील खून प्रकरणाचा उलगडा ७२ तासांत करीत दोन संशयितांना जेरबंद केले. संशयितांना कल्याण येथे तेथील पोलिसांच्या मदतीने मुक्ताईनगर पोलिसांनी अटक केली. अवघ्या १५ हजारांच्या रकमेसाठी खून करण्यात आल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले.
मुक्ताईनगर शहरातील सातोड शिवारातील सीताराम बिचकुले यांच्या शेत गट क्रमांक १२७ समोरील नाल्यात चिनावल (ता. रावेर) येथील रवींद्र पाटील (४६) यांची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली होती. ही घटना सहा जूनला सकाळी उघडकीस आली असली, तरी मृताचा दोन दिवसांपूर्वी खून झाल्याचा संशय वर्तविण्यात आला होता. मुक्ताईनगर येथील पोलिसांनी या खुनाची उकल केली असून, शहरातीलच दोघांना अटक केली आहे. राहुल काकडे (२५, रेणुकामाता मंदिरामागे, रेणुकानगर, मुक्ताईनगर) व योगेश काकडे (१९, जुन्या उर्दू शाळेजवळ, जुनेगाव, मुक्ताईनगर) अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत.




हेही वाचा >>>अमळनेरमध्ये दोन गटांत तुफान दगडफेक; संचारबंदी लागू
चार जूनला रवींद्र पाटील यांच्यासोबत राहुल काकडे व योगेश काकडे हे दोघे होते. रवींद्र पाटील यांच्याकडे १५ हजारांची रोकड असल्याने ती पाहून संशयितांची नियत बदलली. त्यांनी बोदवड-मुक्ताईनगर रस्त्यावरील नाल्यात नेत रवींद्र यांना बेदम मारहाण करीत डोक्यात दगड टाकून त्यांचा खून केला. रक्कम लुटून कल्याणकडे पलायन केले. कल्याण पोलिसांच्या मदतीने स्थानिक मुक्ताईनगर पोलिसांनी दोघा संशयितांना अटक केली.