जळगाव : शहरातील कालिंकामाता मंदिर परिसरातील काशीबाई कोल्हे विद्यालयानजीकच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत गुरुवारी भरदिवसा जबरी चोरी प्रकरणाचा गुन्हा अवघ्या ४८ तांसात उलगडून चोरट्यांच्या मुसक्या आवळून मुद्देमालही हस्तगत करण्यात आला आहे. पोलिसांनी अटक केलेल्या तिघांमध्ये रायगड येथील निलंबित पोलीस उपनिरीक्षकासह त्याचा मुलगा आणि बँक कर्मचाऱ्याचा समावेश आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी दिली. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी गुन्ह्याबाबत माहिती दिली. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत गुरुवारी १७ लाख १०हजार ३७० रुपयांच्या रोकडसह तीन कोटी ६० लाखांचे सोने, असा सुमारे पावणेचार कोटींचा ऐवज चोरी हेल्मेटधारी दोघांनी लंपास केला होता.  शाखा व्यवस्थापक महाजन यांची दुचाकी घेऊन पसार झाले होते. शिवाय, त्यांनी कर्मचार्यांचे भ्रमणध्वनीचे पाच संच सोबत नेले होते. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

अधीक्षक राजकुमार यांनी या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी विशेष पथक नियुक्त करीत तपासाबाबत सूचना दिल्या होत्या. अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित, परिविक्षावधीन उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी व आप्पासाहेब पवार, स्थानिक एलसीबीचे निरीक्षक किसनराव नजन-पाटील, शनिपेठ ठाण्याचे निरीक्षक शंकर शेळके यांनी बँकेतील कर्मचारी व शाखा व्यवस्थापकांना वेगवेगळी विचारपूस केली. त्यात कर्मचारी, फिर्यादी शाखा व्यवस्थापक व मनोज सूर्यवंशी यांच्या जबाबातील तफावत आढळली. त्यामुळे मनोज सूर्यवंशी याच्यावर संशयाची सुई आल्याने त्याची कसून चौकशी झाली. त्याला खाक्या दाखविताच तो बोलू लागला. त्याने सांगितले की, माझा पाहुणा रायगड जिल्ह्यातील पोलीस उपनिरीक्षक शंकर जासक आणि त्याचे वडील रमेश जासक यांच्या संगनमताने आम्ही हा कट रचला होता.

पोलिसांच्या पथकाने कर्जत येथे जाऊन उपनिरीक्षक शंकर जासक याला ताब्यात घेत चौकशी केली. रायगड पोलीस दलातील उपनिरीक्षक जासक हा ऑक्टोबर २०२१ पासून नोकरीवर गैरहजर आहे, असे चौकशीत स्पष्ट झाले. शंकर जासक याच्या पत्नीचा भाऊ मनोज सूर्यवंशी हा जळगावातील कालिंकामाता मंदिर परिसरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत करारतत्त्वावर शिपाई म्हणून काम करतो. या तिघांनी हा बँक लुटीचा कट रचला होता. जबरी चोरीतील १६ लाख ४० हजार ३७० रुपये रोख, तसेच तीन कोटी ६० हजार रुपयांचे ६०१५.८४ ग्रॅम सोने शंकर जासक याच्या कर्जत येथील घरातून जप्त करण्यात आले आहे. पोलिसांनी गुन्हेगारांच्या शोधार्थ संपूर्ण यंत्रणा कामाला लावली होती. गल्लीबोळातून फिरून वेगवेगळ्या पथकांनी सर्व सीसीटीव्ही चित्रण आणि धागेदोरे तपासले. त्यातून चोरट्यांचा माग समजून आला. गुन्ह्यात वापरलेली दुचाकी कुसुंबा बसस्थानकानजीक मिळून आली, तर बँकेचे सीसीटीव्हीचे डीव्हीआर, हेल्मेट, कर्मचार्यांचे भ्रमणध्वनी संच एमआयडीसी परिसरातील नाल्यात मिळून आले होते. उर्वरित ७० हजार रुपये हस्तगत करणे बाकी आहे.

शंकर जासक याच्यावर अगोदरच निलंबनाची कारवाई झाली असून, वर्षभरापासून तो वैद्यकीय रजेवर आहे. पोलीस महासंचालकांनी रायगड पोलीस अधीक्षकांना शंकर जासक याला बडतर्फ करण्याची कारवाई करण्याची सूचना केली आहे. शंकर जासक याचे वडील जळगावनजीकच्या मन्यारखेडा येथील रहिवासी आहेत. पोलीस प्रशासनाकडून तपास पथकाला बक्षीसदेखील जाहीर करण्यात आले आहे, असे पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी सांगितले. दरम्यान, स्टेट बँकेतील जबरी चोरीप्रकरणी पोलिसांनी तपासचक्रे फिरवीत शुक्रवारी (2 जून) बँकेतील कर्मचार्याला ताब्यात घेत चौकशी सुरू केली होती. त्याच्याकडून चोरट्यांची नावे निष्पन्न झाली होती. त्याअनुषंगाने चोरट्यांच्या शोधासाठी वेगवेगळ्या ठिकाणी पथकेही रवाना करण्यात आली होती. अयोध्यानगरमार्गे दुचाकीवरून जात असताना काशिनाथ लॉज भागातील एका सीसीटीव्ही कॅमेर्यात दोघे चोरटे कैद झाले. ते पाचोर्याच्या दिशेने जात असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानुसार पोलिसांकडून शोध सुरू करण्यात आला होता. चोरट्यांनी नाल्यात फेकलेला सीसीटीव्हीचा डीव्हीआर पोलिसांनी ताब्यात घेतला होता. त्यासाठी सायबरतज्ज्ञांचीही मदत घेतली गेली.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The suspended police sub inspector to be a thief state bank theft ysh
First published on: 04-06-2023 at 11:02 IST