नाशिक – मनमाड शहर परिसरातील अनकवाडे शिवारात मुंबई-मनमाड-बिजवासन उच्चदाब भूमिगत पेट्रोलियम वाहिनीला छिद्र पाडून पेट्रोलियम पदार्थाची चोरी करणाऱ्या टोळीला मनमाड शहर पोलिसांनी ताब्यात घेतले. पाच संशयितांना अटक करण्यात आली आहे.
अनकवाडे शिवारात मुंबई-मनमाड-बिजवासन या वाहिनीमधून पेट्रोल, डिझेलची चोरी करण्याचा प्रकार उघडकीसआला. याबाबत मनमाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याच्या तपासासाठी मनमाड शहर पोलीस निरीक्षक विजय करे यांनी पथक तयार केले. माहितीदार तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी सुनील उर्फ सोनु तिवारी (३५, रा. कल्याण), कथुरायन उर्फ कार्तिक मुदलीयार (३८, रा.मुंबई) यांना काकासाहेब गरूड यांच्या कुक्कुटपालन केंद्राजवळून ताब्यात घेतले. मोहम्मद शेख (४०, रा. गोवंडी) याला मुंबई येथून ताब्यात घेतले. इरफान मोमीन (रा. मनमाड) , काकासाहेब गरूड (रा. अनकवाडे) यांनाही ताब्यात घेण्यात आले. पाच संशयित ताब्यात असून वाहिद सय्यद आणि याकुब शेख , अमजद कुरेशी (सर्व रा. मुंबई) हे फरार आहेत.
दरम्यान, सुनील उर्फ सोनु याच्यावर मुंबई येथील दोन पोलीस ठाण्यात गु्न्हे दाखल आहेत. इरफानवर मनमाड पोलीस ठाण्यात सहा गुन्हे दाखल आहेत.