शहरात लक्ष्मीपूजनाचा उत्साह ओसंडून वाहत असतानाच येथील कलेक्टर पट्टा भागातील एका बंगल्यात शिरलेल्या चोरट्याने नकली बंदुकीचा धाक दाखवत धुमाकूळ घातल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. तब्बल दोन तासाच्या थरार नाट्यानंतर या चोरट्यास जेरबंद करण्यास यश आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कलेक्टर भागातील जैन स्थानकाजवळील निमेश दोशी या व्यापाऱ्याच्या घरी चोरीचा हा अयशस्वी प्रयत्न झाला आहे. दुपारी एक वाजेच्या सुमारास दोशी यांची पत्नी,दोन मुली व घरकाम करणारी बाई अशा चौघी घरात असताना दोशी यांनी पाठवले असा बहाना करून एका अनोळखी व्यक्तीने त्यांच्या घरात प्रवेश मिळवला. त्यानंतर बंदुकीचा धाक दाखवत घरात असलेल्या सोन्या-चांदीचे दागिन्यांची मागणी तो करू लागला. दोशी यांच्या मुलीने त्याचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता त्याने तिच्या हाताला चावा घेतला. तसेच त्यांच्या पत्नी भावना यांना जवळच पडलेली कात्री त्याने मारून फेकली. प्रसंगावधान राखत भावना यांनी बेडरुममध्ये जात आतून दरवाजा बंद केला. तसेच घराबाहेर पळालेल्या दोन्ही मुलींनी बाहेरुन घराचा दरवाजा बंद करत आरडाओरड सुरु केली. त्यामुळे घाबरलेल्या चोरट्याने गच्चीवर जात बाहेरून दरवाजा बंद केला.

हेही वाचा >>> नाशिक: नांदुरशिंगोट्यात दरोडेखोरांचा धुमाकूळ; लाखोंचा ऐवज लंपास

हा प्रकार समजल्यावर घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर लोक जमा झाले. पोलीस तसेच मुख्य अग्निशमन अधिकारी संजय पवार हे दलाच्या जवानांसह घटनास्थळी दाखल झाले. गच्चीवर गेलेल्या या चोरट्याला दरवाजा उघडून खाली येण्यासाठी हे सर्व जण समजावत होते. घटनास्थळी आलेले पालकमंत्री दादा भुसे यांनीदेखील शेजारच्या बंगल्याच्या गच्चीवर जाऊन या चोरट्यास समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र बाहेर जमलेल्या आक्रमक जमावापासून आपल्या जीवितास धोका असल्याची भीती तो बोलून दाखवत होता. तेव्हा भुसे यांनी जमावापासून कुठलाच धोका होणार नाही,असा विश्वास देत पोलिसात हजर होण्याचा सल्ला त्याला दिला. अखेरीस त्यास तो राजी झाला व तब्बल दोन तासानंतर या थरार नाट्याचा शेवट झाला.

पाहा व्हिडीओ –

ही बंदूक नकली असल्याचे नंतर निष्पन्न झाले. कृष्णा पवार असे या व्यक्तीचे नाव असून येथील डीके चौक भागात त्याचे गॅरेज आहे. तसेच तो दोशी यांच्या ओळखीतला असल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी येथील छावणी पोलीस ठाण्यात सायंकाळपर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thief with fake gun arrested for robbery attempt in businessman house zws
First published on: 24-10-2022 at 20:43 IST