लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक : वन संपदेचे रक्षण करणाऱ्या वन विभागालाच चोरट्यांनी आव्हान दिले आहे. शहरातील त्र्यंबक रस्त्यावरील मुख्य वनसंरक्षकांच्या बंगल्याच्या आवारातून चार चंदनाची झाडे कापून चोरून नेण्यात आली

याबाबत सुरक्षारक्षक युवराज जाधव यांनी तक्रार दिली. जाधव हे त्र्यंबक रस्त्यावरील मुख्य वनसंरक्षक वास्तव्यास असलेल्या जारूल बंगल्यावर सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत आहेत. गुरूवारी चोरट्यांनी या बंगल्यातील चंदनाची चार झाडे कापली. बुंध्यापासून वर तीन ते चार फूटाचे खोड (लाकूड) चोरून नेले. सुमारे ४८ हजार रुपयांचे चंदन चोरांनी लंपास केले.

आणखी वाचा-नाशिकमध्ये धोकादायक काझीगढीत घरांची पडझड; सुमारे १०० रहिवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

सुरक्षारक्षक तैनात असताना हा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. याआधी शासकीय अधिकाऱ्यांच्या निवासस्थान परिसरातून चंदनाची झाडे चोरून नेण्याचे प्रकार घडले आहेत. आता चोर थेट वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या निवासस्थान परिसरात पोहोचल्याचे या घटनेतून उघड झाले. या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.