जळगाव : जिल्ह्यातील अमळनेर शहरालगतच्या चोपडा रस्त्यावरील उड्डाण पुलाजवळील पाण्याने भरलेल्या खदाणीत सेल्फी काढण्याचा प्रयत्न तीन अल्पवयीन मित्रांच्या जीवावर बेतल्याची हृदयद्रावक घटना मंगळवारी घडली. खदाणीच्या मध्यभागी असलेल्या बेटासारख्या उंचवट्यावर उभे राहून छायाचित्र काढत असताना एका मुलाचा तोल जाऊन तो खोल पाण्यात पडला. त्याला वाचविण्यासाठी धावलेल्या अन्य दोघांनाही पाण्याने ओढल्याने तिघांचाही बुडून मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने अमळनेर शहरावर शोककळा पसरली असून, संपूर्ण परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मानव बंटी रतनानी (वय १४), कार्तिक विकी उधवानी (वय १४) आणि दिनेश विजय पंजवानी (वय १७) अशी मृत मुलांची नावे आहेत. तिघेही अमळनेर येथील सिंधी कॉलनीतील रहिवासी होते. मानव आणि कार्तिक हे नववीत शिक्षण घेत होते, तर दिनेश हा प्रताप महाविद्यालयात अकरावी वाणिज्य शाखेत शिकत असून अर्धवेळ नोकरीही करत होता.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी सुमारे ४.५० वाजेच्या सुमारास तिघे मित्र फिरण्यासाठी खदाणीच्या परिसरात गेले होते. यावेळी खदाणीच्या मध्यभागी असलेल्या बेटासारख्या उंचवट्यावर कमी पाणी असल्याने ते पाण्यातून चालत तेथे पोहचले. यानंतर मोबाईलवर सेल्फी काढत असताना एका मुलाचा अचानक पाण्यात तोल गेला. आणि तो सुमारे ३० फूट खोल पाण्यात पडला. मित्राला वाचविण्यासाठी दुसऱ्या मुलाने त्याचा हात पकडण्याचा प्रयत्न केला; मात्र तोही खोल पाण्यात ओढला गेला.

दोघांना वाचविण्यासाठी तिसऱ्या मित्रानेही धाव घेतली; परंतु पाण्याची खोली आणि तळाचा अंदाज न आल्याने तिघेही एका पाठोपाठ पाण्यात बुडाले. दरम्यान, ही घटना खदाणीजवळून जात असलेल्या एका रिक्षाचालकाच्या लक्षात आली. त्याने तत्काळ घटनास्थळी धाव घेत ११२ क्रमांकावर संपर्क साधून पोलिसांना माहिती दिली.

माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, नायब तहसीलदार सी. यू. पाटील, शहर तलाठी अशपाक पिंजारी, पोलीस कर्मचारी गणेश पाटील तसेच स्थानिक नागरिक घटनास्थळी दाखल झाले. देवळी येथील दीपक मोरे यांनी जीवाची पर्वा न करता खदाणीत उडी मारून तिन्ही मुलांना बाहेर काढले. मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अमळनेर ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.

एकाच वेळी तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू झाल्याने सिंधी कॉलनीसह संपूर्ण अमळनेर शहरात शोककळा पसरली. ग्रामीण रुग्णालयात मृतांचे नातेवाईक व नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. कुटुंबीयांचा आक्रोश पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पावसाळ्यात पाण्याने भरलेल्या खदाणी, तलाव, नाले व इतर धोकादायक जलाशयांपासून दूर राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. पाण्याची खोली आणि तळाचा अंदाज येत नसल्याने अशा ठिकाणी सेल्फी काढणे किंवा विनाकारण जाणे टाळावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी नागरिकांना केले.