शहरातील गंगापूर रस्त्यावरील थत्तेनगर परिसरात पायी जाणाऱ्या ज्येष्ठ व्यक्तीकडील तीन लाखाची रक्कम दुचाकीवरून आलेल्या चोरटय़ांनी लंपास केली. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे स्थानिकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मांडसांगवी येथील दत्तात्रय दामोदर बर्वे (६३) हे गंगापूर रस्त्यावरील एका बँकेत आले होते. बँकेतील कामकाज आटोपून ते तीन लाखाची रक्कम घेऊन दुसऱ्या बँकेत भरण्यासाठी निघाले. पायी जात असताना दुचाकीवरून आलेल्या चोरटय़ांनी सप्तरंग चौकात बर्वे यांच्या हातातील रक्कम असणारी पिशवी खेचत क्षणार्धात पोबारा केला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे भयभीत झालेल्या बर्वे यांनी पोलिसांशी संपर्क साधला. या घटनेची माहिती समजल्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दुसऱ्या घटनेत महात्मा गांधी रस्त्यावरील बँक ऑफ इंडियामध्ये नोटा बदलून देण्याच्या बहाण्याने चोरटय़ाने एका ग्राहकाचे ४२ हजार ५०० रुपये लंपास केले. संबंधित ग्राहक बँकेत पैसे भरण्यासाठी आला असताना संशयिताने नोटा बदलून देण्याचे निमित्त करून पैसे घेऊन पलायन केले. या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, शहरात सोनसाखळी लंपास करणे, पोलीस असल्याची बतावणी करून लुटमार असे अनेक प्रकार घडले आहेत. बँकेतून मोठी रक्कम काढणाऱ्या ग्राहकावर पाळून ठेवून त्यांची रोकड लंपास करण्याचे काही प्रकार याआधी घडले आहेत. शहरातील गुन्हेगारीचा आलेख उंचावत असताना या घटनांना रोखण्यात पोलीस यंत्रणा अपयशी ठरल्याची सर्वसामान्यांची भावना आहे.



