नाशिक – बांधकाम प्रकल्पासाठी केलेले खोदकाम, त्यात पावसामुळे साचलेले पाणी आणि अशा ठिकाणी सुरक्षारक्षक नसणे, या बाबी तीन अल्पवयीन मित्रांच्या जिवावर बेतल्याचे पंचवटीतील विडी कामगार नगरमधील घटनेतून उघड झाले. बांधकामाधीन प्रकल्पाच्या काही भागात पत्रे लावलेले होते. तर, मागील काही भाग उघडा होता. हटकणारे कुणीही नसल्याने हे अल्पवयीन मित्र सहजपणे आतमध्ये पोहोचले. बांधकामस्थळी सुरक्षेसंबंधी आवश्यक खबरदारी न घेतल्याने तिघांचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत स्थानिकांनी अमृतधाम चौफुली ते छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर आंदोलन केले. या प्रकरणात बांधकाम व्यावसायिक आणि ठेकेदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सायंकाळी उशिरापर्यंत सुरु होती.
पंचवटीतील विडी कामगार नगरात इमारत बांधकामासाठी खोदलेल्या खड्ड्यातील पाण्यात बुडून तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू झाला. साई गरड (१४), साई जाधव (१४) आणि साई उगले (१३) अशी या तीन मुलांची नावे आहेत. तिघेही विडी कामगारनगर भागात वास्तव्यास होते. रविवारी सुट्टीच्या दिवशी हे तिघे मित्र सकाळी ११ वाजता घरातून फिरण्यासाठी बाहेर पडले. एकाने त्र्यंबकेश्वरजवळील पहिणे येथे जाणार असल्याचे सांगितल्याचे बोलले जाते. घर परिसरात कालव्यालगतच्या भागात नव्या इमारतीचे काम सुरू आहे. पायासाठी खोदलेल्या विस्तीर्ण खड्ड्यात पावसाचे पाणी साचले आहे. या ठिकाणी तिघे जण पाण्यात खेळण्यासाठी वा आंघोळीसाठी उतरल्याचा अंदाज वर्तविला जातो. यावेळी खोलीचा अंदाज न आल्यामुळे ते बुडाल्याची शक्यता पंचवटी विभागीय अग्निशमन केंंद्राचे प्रमुख प्रदीप बोरसे यांनी व्यक्त केली.
सायंकाळी उशिरापर्यंत मुले घरी न परतल्याने कुटुंबियांनी शोधाशोध सुरू केली. एकाच्या कुटुंबाने पहिणे येथे जाऊन शोध घेतला. मात्र त्यांचा थांगपत्ता न लागल्याने अखेर रात्री पालकांनी आडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली. कुटुंबिय आणि स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी बेपत्ता मुलांचा शोध सुरू केला. रात्री मंगल कार्यालये धुंडाळली. सोमवारी सकाळी पोलीस कर्मचारी बांधकाम प्रकल्पाच्या परिसरात गेल्यावर खड्ड्याजवळ मुलांचे कपडे आणि चपला आढळल्या. अग्निशमन दलाच्या मदतीने शोध मोहीम राबवून तिघांचे मृतदेह खड्ड्यातील पाण्यातून बाहेर काढण्यात आले. मृतदेह पाहून कुटुंबियांनी एकच आक्रोश केला. स्थानिक माजी नगरसेवक उद्धव निमसे यांच्यासह अन्य राजकीय पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली.
बांधकाम व्यावसायिकासह ठेकेदार ताब्यात
दी व्ही पार्क या नावाने बांधकाम प्रकल्पाचे काम या ठिकाणी सुरू आहे. इमारतीच्या पायासाठी खोदलेल्या खड्ड्यातील पाण्यात ही दुर्घटना घडली. बांधकाम व्यावसायिकाने या ठिकाणी सुरक्षेची कुठलीही काळजी घेतली नसल्याचा आरोप स्थानिकांनी करीत अमृतधाम चौफुली ते छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर आंदोलन केले. बांधकाम स्थळावर पुढे पत्रे लावलेले आहेत. परंतु, मागील बाजूचा भाग मोकळा आहे. या ठिकाणी दरवाजा बसविण्यात आला नसल्याचा आरोप माजी नगरसेवकांनी केला. आंदोलनामुळे काही काळ वाहतूक कोडी झाली होती. बांधकाम व्यावसायिकावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्याची मागणी आंदोलकांनी केली. यानंतर पोलिसांनी बांधकाम व्यावसायिक विजय शेखालिया (सिडको) आणि आकाश गायकवाड (पेठरोड) यांना ताब्यात घेतले. आडगाव पोलीस ठाण्यात मुले बेपत्ता असल्याचा गुन्हा दाखल होता. आता हयगयीने मृत्यू असे कलमांत बदल होतील, असे पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांनी सांगितले.