नाशिक: भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत स्वराज्य महोत्सवात मंगळवारी सकाळी आयोजित समूह राष्ट्रगान कार्यक्रम सर्व तयारी झाली असताना ऐनवेळी पुढे ढकलण्यात आल्यामुळे महापालिका प्रशासनाची धांदल उडाली. मनपा मुख्यालयात राष्ट्रगीत गायनासाठी जमलेले छात्रसैनिक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचाही हिरमोड झाला. अखेर समूह राष्ट्रगानऐवजी इतर कार्यक्रम पार पाडण्यात आले. ढोलताशांचा गजर झाला. राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी) छात्रांनी देशभक्तीपर गाणी सादर केली. नाशिक सायकलिस्टची सायकल फेरी पार पाडली. दुसरीकडे भोसला सैनिकी शाळेच्या प्रवेशद्वारासमोर नागरिकांनी एकत्र येऊन राष्ट्रगीत गायनातून देश आणि राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.

क्रांती दिनाचे औचित्य साधून महापालिकेच्या मुख्यालयासह विभागीय कार्यालयात सकाळी ११ वाजता सामूहिक राष्ट्रगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मनपाच्या मुख्य इमारतीला विद्युत रोषणाई आणि मुख्य दरवाजाला आकर्षक सजावट करण्यात आली आहे. विविधरंगी आकर्षक रांगोळीने मुख्यालयाचे सौंदर्य खुलविण्यात आले. ध्वजस्तंभ आणि परिसर फुलांनी सजविण्यात आला. समूह राष्ट्रगीत कार्यक्रमाची संपूर्ण तयारी करण्यात आली. ढोल पथक, छात्रसेनेचे विद्यार्थीही मुख्यालयात आले. अधिकारी, कर्मचारी उपस्थित झाले. समूह राष्ट्रगीत कार्यक्रमास अवघ्या काही मिनिटांचा अवधी असताना अचानक शासनाकडून आलेल्या आदेशाने प्रशासनाची धावपळ उडाली. स्वराज्य महोत्सवांतर्गत मंगळवारी आयोजित कार्यक्रम पुढे ढकलण्यात आल्याचे पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने दूरध्वनीद्वारे कळविले. यास्तव समूह राष्ट्रगीत कार्यक्रम आयोजनाबाबत आधी दिलेल्या सूचना रद्द केल्या जात असल्याचा आदेश निघाला. या कार्यक्रमाची सुधारित तारीखनंतर कळविली जाणार असल्याचे शासनाने म्हटले आहे.

हे आदेश इतके वेळेवर आले की मुख्यालयासह विभागीय कार्यालयात ते पोहचविण्यासाठी अधिकाऱ्यांना धडपड करावी लागली. मुख्यालयात समूह राष्ट्रगीत वगळता उर्वरित कार्यक्रमाचे घेण्यात आले. राष्ट्रगीत कार्यक्रम रद्द झाल्याने जमलेल्या विद्यार्थी व कर्मचाऱ्यांना धक्का बसला. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे, अशोक आत्राम उपस्थित होते. शिवताल ढोल पथकाने आपली कला सादर केली. एसव्हीकेटी, एचपीटी, बीवायके या महाविद्यालयातील छात्रसेनेच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गाणी सादर केली. नंतर सायकल फेरीला हिरवा झेंडा दाखविला गेला. त्यात ७५ सायकलपटूंनी सहभाग नोंदविला. काही विभागीय कार्यालयात सुरू असलेले कार्यक्रम आटोपते घेण्यास सांगण्यात आले. या एकंदर प्रकाराने शासकीय आदेशाच्या कार्यपद्धतीवर संताप व्यक्त होत आहे.

भोसला प्रवेशद्वारात उत्साहात राष्ट्रगान
महापालिकेने समूह राष्ट्रगीताचा कार्यक्रम ऐनवेळी थांबवला असला तरी सामाजिक संस्थांचे कार्यक्रम उत्साहात पार पडले. क्रांती दिवस संस्मरणीय करण्यासाठी सोनाली दाबक यांच्या पुढाकारातून भोसला सैनिकी शाळेच्या प्रवेशद्वारावर समूह राष्ट्रगीत गायनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात सुमारे १०० नागरिक सहभागी झाले. एकत्रितपणे राष्ट्रगीत गायनाची वेगळी अनुभूती मिळाल्याची भावना दाबक यांनी व्यक्त केली.