मालेगाव : टिपू सुलतान यांच्याविषयी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या विधानानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले असतानाच, आता मालेगावचे माजी आमदार आणि ‘इस्लाम’ पार्टीचे प्रमुख आसिफ शेख यांनी या वादात उडी घेतली आहे. आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज आदरणीय आहेतच, पण टिपू सुलतान हे इंग्रजांविरोधात देशासाठी लढले नाहीत का, असा सवाल शेख यांनी भाजपला विचारला आहे.
मालेगावच्या नवनिर्वाचित उपमहापौर शान-ए-हिंद यांच्या दालनात टिपू सुलतान यांचे छायाचित्र लावण्यात आले होते. यावरून वाद निर्माण झाला होता. हिंदुत्ववादी संघटनांनी त्यास आक्षेप घेतल्यानंतर महापालिका प्रशासनातर्फे ही छायाचित्र काढून टाकण्याची कार्यवाही करण्यात आली. त्यानंतर हा वाद शमला असतानाच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतान यांची छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी तुलना केली. यावरून नवा वाद निर्माण झाला. राज्यात ठिकठिकाणी सपकाळ यांच्या वक्तव्याचा निषेध केला जात आहे. रविवारी मालेगावात देखील भाजपतर्फे सपकाळ यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.
रविवारी इस्लाम पक्षाचे पहिले राज्यस्तरीय संमेलन येथे पार पडले. या निमित्ताने छायाचित्र वादाच्या पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलताना आसिफ शेख यांनी भाजपवर निशाणा साधला. टिपू सुलतान केवळ एका विशिष्ट धर्माचे होते म्हणून त्यांना भाजपतर्फे विरोध केला जात आहे. भारतीय स्वातंत्र्यासाठी टिपू सुलतान हे इंग्रजांविरुद्ध प्राणपणाने लढले. त्यांच्या कार्याची दखल खुद्द भारतीय संविधानाने घेतली आहे. मग त्यांना विरोध करणारे हे कोण,असा सवाल आसिफ शेख यांनी उपस्थित केला. भाजप आणि हिंदुत्ववादी संघटना जाणीवपूर्वक दोन धर्मांत तेढ निर्माण करून तिरस्काराचे राजकारण करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
पाकिस्तानशी क्रिकेट का खेळता?
शेख यांनी भारताने पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळण्याबद्दल आक्षेप नोंदवत भाजपच्या दुटप्पीपणावर बोट ठेवले आहे. एकीकडे पाकिस्तान भारतात दहशतवाद पसरवतो, हल्ले करतो, तरीही त्यांच्यासोबत क्रिकेट खेळले जाते. फक्त कोट्यवधी रुपये कमवण्यासाठी तुम्ही पाकिस्तानशी संबंध ठेवत नाही का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. शहरातील शांतता टिकवण्यासाठी उपमहापौरांच्या दालनातील छायाचित्र काढण्यात आले, तरीही भाजपकडून या विषयावर गोंधळ घालण्यात येत असल्याची टीका शेख यांनी केली.
संविधान बदलण्याचा प्रयत्न
छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आदर्श आहेत. घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले अशा महापुरुषांचा आम्हाला कायम अभिमान राहिला आहे व भविष्यात देखील तो कायम राहील. आम्ही संविधानाचा आदर करणारे आहोत,असे नमूद करत २०१४ नंतर देशात विशिष्ट धर्माला लक्ष्य करण्याचे राजकारण सुरू झाले असल्याची टीका शेख यांनी भाजपवर केली. भाजपला देशाचे संविधान बदलायचे आहे, पण ते त्यात कधीही यशस्वी होणार नाहीत, असा इशाराही आसिफ शेख यांनी दिला.
