नंदुरबार : सर्वसामान्यांना तोरणमाळ गाठण्यासाठी दळणवळणाची पुरेशी साधने नसतांना प्रशासनातर्फे पर्यटन वाढीसाठी ‘तोरणमाळ फेस्टिव्हल’चा घाट घालण्यात आला आहे. गेल्या दिड वर्षांपासून तोरणमाळची बससेवा बंद असल्याने पर्यटक या महोत्सवासाठी कसे येतील, केवळ मोटारधारक असलेल्यांसाठीच या महोत्सवाचे आयोजन केले जात आहे काय, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ येथे पर्यटन वाढीसाठी कधी नव्हे, तो प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढाकारातून तोरणमाळ येथे २० ते २२ फेब्रुवारी या कालावधीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या महोत्सवाच्या आयोजनाविषयी कोणतीच विचारणा न केल्याने स्थानिक आमदार आमश्या पाडवी यांनी प्रशासनावर आगपाखड केली होती.
तोरणमाळ पर्यटनस्थळाच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी तसेच आदिवासी समाजाच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडविण्यासाठी तीन दिवसीय ‘तोरणमाळ महोत्सव’चे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी विविध विभागांना जबाबदाऱ्या सोपविल्या आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयास कार्यक्रमस्थळी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे, गर्दी नियंत्रण तसेच वाहतुकीचे सुयोग्य नियमन करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
तळोद्याच्या सहायक जिल्हाधिकाऱ्यांकडे संपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन, समन्वय व अंमलबजावणीची जबाबदारी देण्यात आली आहे. स्थानिक कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देत आदिवासी नृत्य, लोककला, हस्तकला व पारंपरिक परंपरांचा उत्सव साजरा केला जाणार आहे. तोरणमाळ हे वनक्षेत्रात असल्याने वनविभागास पर्यटकांची सुरक्षितता, नैसर्गिक पर्यावरणाचे संवर्धन तसेच कार्यक्रमासाठी आवश्यक तात्पुरत्या परवानग्या देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
महोत्सवादरम्यान स्वच्छतेसाठी विशेष पथके तैनात केली जाणार असून फिरत्या शौचालयांची व्यवस्था करण्यात येणार आहे. पिण्याच्या पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सक यांना प्राथमिक उपचार केंद्र, वैद्यकीय पथके, रुग्णवाहिका आदी सुविधा उपलब्ध करून देण्याचे तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास आपत्कालीन परिस्थितीसाठी सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महावितरण विभागास अखंडित वीजपुरवठा राखण्यास सुचित करण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागास रस्ते व पायाभूत सुविधा सुस्थितीत ठेवण्याचे निर्देश आहेत.
प्रशासनाकडून अशी सर्व तयारी करण्यात येत असताना गेल्या दिड वर्षांपासून शहाद्याहून तोरणमाळसाठी येणारी मिनी बससेवा बंद आहे. त्यामुळे स्थानिकांना म्हसावद, शहादा गाठण्यासाठी खासगी वाहनांद्वारे जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. बससेवा बंद असल्याने तोरणमाळ पर्यटनावरदेखील त्याचा परिणाम झाला आहे. जे सामान्य पर्यटक बस प्रवास करुन तोरणमाळ पर्यटनाचा आनंद घेत होते, त्यांचे बसअभावी तोरणमाळला येणे बंद झाले आहे. असे असतांना प्रशासनाकडून आयोजित तोरणमाळ महोत्सवात पर्यटकांना याठिकाणी पोहचण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. स्वत:ची मोटार असलेले धनदांडगे पर्यटकच तोरणमाळ महोत्सवाचा आनंद लुटतील. परंतु, ज्यांच्याकडे मोटार नाही, त्यांना या महोत्सवाच्या आनंदापासून मुकावे लागण्याची शक्यता आहे.
तोरणमाळसाठी मिनीबस मिळाव्यात, यासाठी प्रशासनाने राज्यस्तरावर पाठपुरावा केला होता. परंतु, राज्यस्तरावरून मिनीबस खरेदीचे धोरण बंद केल्याने तोरणमाळच्या बससेेवेला अडसर निर्माण झाला आहे. जिल्हा नियोजन समितीतून तत्कालीन पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांनी देखील बस खरेदी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. परंतु, त्यात देखील तांत्रीक अडचणी असल्याने ही खरेदी होऊ शकलेली नाही. तोरणमाळच्या सात पायरी घाटमार्गे मोठी बस जावू शकत नाही. राज्य शासनाची उदासीन भूमिका तोरणमाळच्या पर्यटनवाढीस अडथळा ठरत आहे.
शहादा बस स्थानकाचे आगार व्यवस्थापक हरिष भोई यांनी तोरणमाळसाठी मिनीबसच नसल्याने आम्ही सेवा देवू शकत नसल्याचे सांगितले. तसे जिल्हा प्रशासनाला देखील लेखी कळविण्यात आल्याचे ते म्हणाले. मात्र जिल्हा नियोजन अधिकारी शशांक काळे यांनी आम्ही नंदुरबार आणि शहादा बस आगारांना राणीपूरपर्यंत बस जात असल्याने त्या ठिकाणापर्यत बससेवा देण्याचे सुचित केल्याचे लोकसत्ताला सांगितले. राणीपूरहून तोरणमाळपर्यत प्रवासी वाहतूकीसाठी परिवहन अधिकाऱ्यांना खासगी वाहतूकदारांची मदत घेण्याबाबत सांगण्यात आले असल्याचेही त्यांनी नमूद केले.

