लोकसत्ता वार्ताहर नंदुरबार: मार्च महिन्यात जिल्ह्यात गारपिटीसह अवकाळी पावसाने पाच हजार ५६७४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. सहा आणि १७ मार्च रोजी झालेल्या गारपिटीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडल्याचे चित्र आहे. मार्च महिन्यात सातत्याने जिल्ह्यात अवकाळी पाऊस बरसला आहे. सहा मार्च रोजी झालेल्या गारपिटीसह अवकाळीने जिल्ह्यातील ४४७२ शेतकऱ्यांचे २०३९ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. यानंतर १५ मार्च रोजी झालेल्या गारपिटीत ३५ शेतकऱ्यांचे ११.२५ हेक्टरवरील पिकाचे, १७ मार्च रोजी झालेल्या गारपिटीत २८ शेतकऱ्यांचे १३६.८ हेक्टरवरील पिकांचे तर, १९ मार्च रोजी झालेल्या गारपिटीत ६६६४ शेतकऱ्यांचे ३४८६ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे उघड झाले आहे. यातील पहिल्या दोन नुकसानीचे पंचनामे पूर्ण करुन भरपाईसाठी शासन दरबारी मागणी देखील करण्यात आली असून नंतरच्या दोन नुकसानीचे पंचनामे येत्या दोन दिवसात पूर्णत्वास येतील, असा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. आणखी वाचा- नाशिक : तृणधान्य महोत्सवास जिल्हा परिषदेकडून अखेर मुहूर्त जिल्ह्यातील कांदा, ज्वारी, गहू, मका , हरभरा, भाजीपाला, आंबा, टरबूज, केळी, पपई यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील जवळपास ११ हजार ५४४ शेतकऱ्यांना या अवकाळीचा फटका बसला आहे. शासकीय मोजमापानुसार हे नुकसान जवळपास १२ कोटीच्या घरात असण्याची शक्यता आहे.