मालेगाव : ‘येळकोट येळकोट,जय मल्हार’ असा जयघोष आणि भंडाऱ्याची उधळण करत शहरालगतच्या सवंदगाव येथील खंडेराव महाराज मंदिरात मंगळवारी चंपाषष्ठीनिमित्त आयोजित यात्रोत्सवाला प्रारंभ झाला आहे. यानिमित्ताने भक्तांचा उत्साह ओसंडून वाहत होता.
सवंदगाव शिवारात पेंभारगड डोंगर आहे. याठिकाणी असलेल्या महाराष्ट्राचे कुलदैवत खंडेराव महाराजांच्या मंदिरात चंपाषष्ठी निमित्त दरवर्षी तीन दिवसीय पारंपारिक यात्रोत्सव साजरा केला जातो. मंगळवारी या यात्रोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. सालाबादाप्रमाणे यंदा देखील भाविकांनी मोठ्या संख्येेने या यात्रोत्सवात हजेरी लावली. यावेळी भाविकांनी मोठ्या भक्ती भावाने खंडोबा देवाचे दर्शन घेतले व पूजाअर्चा देखील केली.यानिमित्त संपूर्ण परिसरात भंडाऱ्याची उधळण करण्यात आली. या यात्रोत्सवात संवदगाव परिसरातील भाविक सामील झाले आहेत.
प्रारंभी गावातून काठी मिरवणूक काढण्यात आली. बुधवारी देखील काठी मिरवणूक तसेच पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे. श्रद्धेचे प्रतीक असलेली काठी व पालखीची घरोघरी मोठ्या भक्ती भावने पूजा केली जाते. या यात्रेनिमित्त सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांची देखील रेलचेल असणार आहे. गुरुवारी भव्य कुस्त्यांची दंगल होणार आहे. यात महाराष्ट्रातील नामवंत मल्ल सहभागी होणार आहेत.
चंपाषष्ठीचे महत्व…
पुराणातील कथेनुसार भगवान शंकरांनी मार्तंडभैरव अवतार घेऊन ‘मणी आणि मल्य’ या दानवांशी युद्ध केले. सलग सहा दिवस चाललेल्या या युद्धात मार्तंडभैरवांनी दोन्ही दानवांचा वध केला. हाच तो चंपाषष्ठीचा विजयी दिवस. दुष्ट राक्षसांचा सर्वनाश करून संत,महंत,देव,साधू आणि जनांची त्रासातून मुक्तता झाली आणि आपल्या अध्यात्मिक, धार्मिक, सामाजिक संस्कृतीचे रक्षणही झाले. या विजयोत्सवानिमित्त देवदेवता, साधू-संत,भाविकांकडून खंडोबा देवावर चाफ्याची फुलं,हळदीचा वर्षाव केला जातो. विजयी दिवसाचे प्रतीक म्हणून ‘येळकोट’ नामाची गर्जना करत या उत्सवाची पूर्वापार प्रथा पाळली जाते.
