नाशिक – तीन ते चार दिवसांच्या विश्रांतीनंतर गुरुवारी दुपारी शहरात मुसळधार पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली. पाऊण तासात शहरात १६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. मान्सूनपूर्व नाले, पावसाळी गटार आणि ढाप्यांची सफाई झालेली नसल्याने अनेक प्रमुख रस्ते व चौकात पाणी साचून वाहनधारकांना पुन्हा कोंडीला तोंड द्यावे लागले. सिन्नर, निफाडसह येवल्याच्या काही भागातही पाऊस झाला.
मे महिन्यात पावसाने नाशिक जिल्ह्याला चांगलेच झोडपले होते. या महिन्यातील पावसाचे आजवरचे सर्व विक्रम मोडीत निघाले. जूनमध्ये प्रारंभी पावसाने काहिशी उघडीप घेतली. या काळात सूर्यदर्शनही घडले. गुरुवारी स्थितीत बदल झाला. दुपारी साडेतीन वाजता पावसाला जोरदार सुरुवात झाली. जवळपास तासभर तो कोसळला. अल्पावधीत रस्त्याने पाण्याचे लोट वाहू लागले.
हवामान विभागाच्या माहितीनुसार या काळात १६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. अल्पावधीत मुसळधार पाऊस झाल्याने महानगरपालिकेच्या कामांचे पितळ उघडे पडले. पावसाळी गटार, नाले, ढाप्यांची सफाई न झाल्यामुळे पाण्याचा निचरा होण्यात अडथळे आले. अनेक भागात पाणी साचून वाहतूक कोंडी झाली. मे महिन्यात जी स्थिती होती, त्यात कुठलीही सुधारणा झाली नाही. मान्सूनपूर्व कामे ५० टक्केही झाली नसल्याने शहरवासीयांना वारंवार त्याच अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.
नाशिकरोड, पंचवटी आणि सिडको भागात झाडे आणि फांद्या पडण्याचे प्रकार घडले. या काळात काही भागात वीज पुरवठा विस्कळीत झाला.