मनमाड :  मनमाड येथील जंक्शन रेल्वे स्थानकात बुधवारी सकाळी रेल्वे यार्डात परीक्षणासाठी जाणाऱ्या मालगाडीचे दोन डबे लोहमार्गावरून घसरल्याने मनमाड -औरंगाबाद मार्गावरील वाहतूक तब्बल दोन तास ठप्प झाली. रेल्वे पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर पूर्ण केल्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली.

मालवाहतूक करणारी १६ डब्यांची गाडी रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक चार आणि पाच यामध्ये असलेल्या लोहमार्गावरून रेल्वे यार्डात परीक्षणासाठी जात होती. त्यावेळी  इंदूर- पुणे या राष्ट्रीय महामार्गाच्या रेल्वे पुलाखाली या गाडीचे दोन डबे घसरले. रेल्वेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या मालगाडीच्या एका डब्याची चाके निखळली. त्यामुळे ही गाडी जागीच थांबली.

दरम्यान, याच वेळी जालना- मनमाड- दादर जनशताब्दी एक्सप्रेस ही मनमाडकडे येण्याच्या बेतामध्ये असतानाच हा अपघात झाल्याने औरंगाबादहून येणारी ही गाडी अंकाई रेल्वे स्थानकात तब्बल दीड तास थांबविण्यात आली. मनमाड रेल्वे स्थानकात पुणे- मनमाड- निजामाबाद मेमू पॅसेंजरही दीड तास खोळंबली. रुळांमधील बिघाडामुळेच हा अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. काही महिन्यात अशा प्रकारे येथे अपघात होण्याची ही तीसरी वेळ आहे.