scorecardresearch

मराठी शाळेचे विद्यार्थिनींसाठी अभ्यासिकेत रुपांतर; मालेगावात अत्याधुनिक सुविधा देण्याचे दादा भुसे यांचे आश्वासन

मालेगावात मराठी शाळेचे रुपांतर विद्यार्थिनी आणि महिलांसाठीच्या अभ्यासिकेत करण्यात येत आहे. या अभ्यासिकेत विद्यार्थिनी आणि महिलांसाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिली आहे.

नाशिक : मालेगावात मराठी शाळेचे रुपांतर विद्यार्थिनी आणि महिलांसाठीच्या अभ्यासिकेत करण्यात येत आहे. या अभ्यासिकेत विद्यार्थिनी आणि महिलांसाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिली आहे.
शहरी भागात विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिकांची संख्या अधिक असली तरी फक्त विद्यार्थिनी तसेच इतर महिलांसाठी असलेल्या अभ्यासिकांची संख्या कमी आहे. त्यामुळे ज्यांना घरी अभ्यास शक्य होत नाही, त्यांच्यासाठी अभ्यासिका हा उत्तम पर्याय आहे. परंतु, विद्यार्थिनी आणि महिलांसाठी अशा अभ्यासिका कमी प्रमाणात असल्याने त्यांना नाईलाजास्तव घरातच अभ्यास करणे भाग पडते. त्याचा परिणाम गुणवत्तेवरही होत असतो. यासंदर्भात नाशिकसारख्या शहरात फक्त विद्यार्थिनींसाठी काही अभ्यासिका असल्या तरी मालेगावातही अशा अभ्यासिकांची संख्या वाढण्याची गरज निर्माण झाली आहे. विद्यार्थिनी आणि महिलांसाठी निर्माण झालेली अभ्यासिकेची गरज लक्षात घेऊन मालेगाव येथील प्रभाग क्रमांक एकमध्ये मराठी शाळेचे रुपांतर अभ्यासिकेत करण्यात येत आहे.
याशिवाय मराठी शाळेच्या इमारतीचे नुतनीकरण आणि सुशोभिकरणही करण्यात येणार आहे. या भूमिपूजन सोहळय़ावेळी कृषिमंत्री भुसे यांनी मार्गदर्शन केले. या अभ्यासिकेच्या माध्यमातून फुले दापत्याच्या जीवनपटाचे दर्शन शहरवासियांना होणार असल्याचे भुसे यांनी सांगितले. महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमध्ये केवळ अभ्यासिकाच निर्माण होणार आहे, असे नव्हे तर, टप्प्याटप्प्याने सर्वत्र सुशोभिकरण करण्यात येणार असल्याचे भुसे यांनी सांगितले. चैत्र पौर्णिमेच्या यात्रेनिमित्त सप्तश्रृंग गडावर जाणाऱ्या भविकांना माणूसकीच्या भावनेतून सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमापूर्वी महात्मा फुले यांच्या जयंती निमित्ताने भुसे यांनी महात्मा यांच्या पुतळय़ास अभिवादन केले. यावेळी उपमहापौर निलेश आहेर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सुनील देवरे, सखाराम घोडके, संजय दुसाने, रामभाऊ मिस्तरी, मनोहर बच्छाव आदी उपस्थित होते.

मराठीतील सर्व नाशिक ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Transformation marathi school study female students dada bhuse promises provide state of the art facilities malegaon amy

ताज्या बातम्या