नाशिक : ठाणे ते मानकोली दरम्यानच्या वाहतूक कोंडीमुळे नाशिक-मुंबई महामार्गावरील प्रवास अतिशय जिकिरीचा ठरत असून कोंडीत वाहने दोन-तीन तास अडकून पडत असल्याने प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. या संदर्भात अ‍ॅडव्हान्टेज नाशिक फाऊंडेशन अर्थात ‘नाशिक फस्र्ट’ने पंतप्रधान कार्यालयाकडे दाद मागितली होती. मात्र त्यास प्रतिसाद न मिळाल्याने रखडपट्टी कायम आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे ते अंजुरफाटा मार्गावरील राजकीय नेत्यांची गोदामे, अवघड वाहनांची वाढती संख्या, भिवंडी वळण रस्त्यावरील बंद टोल नाक्याचा अडथळा आदींचे संदर्भ देत कुठे काय अडचणी येतात याकडे लक्ष वेधले होते. त्यावर राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणने उत्तर दिले. भिवंडी टोल नाका हा वडपे-ठाणे मार्गाच्या विस्तारीकरणात हटविला जाईल. माजीवडा-वडपे हा चार मार्गिकेचा टप्पा आठ मार्गिकेचा करण्याचे काम सुमारे १० वर्षांपासून रेंगाळले आहे. पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रार करूनही महामार्गावरील स्थितीत सुधारणा न झाल्यामुळे नाशिक फस्र्टने वाहतूक कोंडी, खड्डे यावरून उच्च न्यायालयात दाद मागण्याचे ठरविले आहे.   चारपदरी महामार्गामुळे वेगवान झालेल्या नाशिक-मुंबई प्रवासाला ठाणे, भिवंडी परिसरातील खड्डे आणि प्रचंड वाहतूक कोंडीने करकचून ब्रेक लावला आहे. या मार्गावर दररोज हजारो वाहने ये-जा करतात. नाशिकहून जाणाऱ्या आणि मुंबईहून नाशिकला येणाऱ्यांना ठाणे, भिवंडीचा टप्पा पार करणे अग्निदिव्य ठरले आहे. अलीकडेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या मार्गावरून नाशिकला आले होते. महामार्गाची दुरवस्था पाहून त्यांनी तातडीने दुरुस्तीचे निर्देश दिले होते. तथापि, परिस्थितीत आजही कुठलाही फरक पडलेला नसल्याचे या मार्गावरून दैनंदिन प्रवास करणारे वाहनधारक सांगतात. या मार्गावरील बिकट परिस्थितीबाबत अ‍ॅडव्हान्टेज नाशिक फाऊंडेशनने पंतप्रधान कार्यालयाकडे पोर्टलवर तक्रार करून हा प्रश्न सोडविण्याची मागणी केली होती. केंद्र सरकारने या मार्गावरील गोंदे ते वडपे आठ पदरी काँक्रीटचा रस्ता करण्याचे जाहीर केले. त्यासाठी पाच हजार कोटींच्या निधीची घोषणा झाली. अनेक वर्षांपासून रखडलेले हे काम तातडीने पूर्ण करण्याची निकड मांडली गेली.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Travel on nashik mumbai highway very difficult due to traffic congestion zws
First published on: 18-08-2022 at 01:13 IST