नाशिक – त्र्यंबकेश्वर परिसरातील निसर्गसौंदर्य आणि डोंगर नेहमीच पर्यटक आणि दुर्गप्रेमींना साद घालत असतात. ब्रम्हगिरी, हरिहरसह परिसरातील इतर गडांवर, डोंगरांवर गिरीभ्रमणासाठी अनेक जण जात असतात. त्यात हिवाळा म्हणजे दुर्गप्रेमींसाठी बाहेर पडण्याचा हंगाम. हिवाळ्यात दुर्गप्रेमी मोठ्या प्रमाणात दुर्ग मोहिमा आखत असतात. काही जण गटाने तर काही जण एकट्यानेही दुर्ग भ्रमंती करतात. दुर्ग भ्रमंती करताना सावधगिरी बाळगणे गरजेचे असते. थोडाही बेसावधपणा, हलगर्जीपणा जीवावर बेतू शकतो. नाशिक जिल्ह्यातील हरसूलजवळील सावरपाडा येथील एका दुर्गप्रेमीच्या बाबतीतही असेच घडल्याचा संशय आहे.
नाशिक जिल्हा हा गडकिल्ल्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. त्यातही निसर्ग आणि साहस असा दुहेरी अनुभव घ्यावयाचा असल्यास त्र्यंबकेश्वर तालुक्यातील कोणत्याही गडकिल्ल्यास भेट द्यावी. सर्व शिणवटा दूर होऊन मनाला आणि शरीराला नवीन तजेला मिळतो. त्र्यंबकेश्वर तालुक्यात त्रिंबकगड (ब्रह्मगिरी), हरिहर किल्ला, बसगड, फणीचा डोंगर, उतवड आणि अंजनेरी हे काही प्रसिध्द गड-किल्ले आहेत. हे सर्व गडकिल्ले सह्याद्रीच्या रांगेतील आहेत.
त्र्यंबकेश्वर परिसरातील त्रिंबकगड (ब्रह्मगिरी) हा त्र्यंबकेश्वर मंदिराच्या मागे ब्रह्मगिरी पर्वतावर आहे. ब्रम्हगिरीवरच गोदावरी नदीचे उगमस्थान आहे. दुर्गप्रेमी आणि भाविकांची कायम वर्दळ असते. हरिहर हा गिरीदुर्ग त्याच्या विशिष्ट आकारासाठी आणि पायऱ्यांच्या वाटेसाठी प्रसिध्द आहे. बसगड आणि फणीचा डोंगर: हे दोन्ही गड त्रिंबकगडच्या जवळच्या डोंगररांगेत आहेत. या गडांवरही दुर्गप्रेमी भटकंतीसाठी जात असतात. हनुमानाचे जन्मस्थान म्हणून अंजनेरीला महत्व आहे.
नाशिक जिल्ह्याच्या पश्चिमेकडे आणि इगतपूरीच्या उत्तरेस एक डोंगररांग गेली आहे.. याच डोंगररांगेला त्र्यंबक रांग असेही म्हणतात. ही रांग दोन भागात विभागली गेली आहे. पहिल्या टप्प्यात बसगड, उतवड, फणीचा डोंगर, हरिहर हे गड वसलेले आहेत, तर दुसर्या टप्प्यात ब्रम्हगिरी, अंजनेरी, घरगड हे किल्ले येतात. दुर्ग भंडार किंवा भंडार दुर्ग हा एक प्रकारचा टेहळणी बुरुज ब्रम्हगिरीजवळच आहे. येथील मुख्य आकर्षण म्हणजे खोल दगडात कोरलेल्या पायऱ्या. ज्या ब्रह्मगिरी पर्वताच्या भेगातून खोलवर जातात आणि नैसर्गिक पुलातून बाहेर पडतात आणि पुन्हा भेगातून वर दुर्ग भंडारात जातात.
अशा या त्र्यंबक परिसरातील डोंगरांवर भटकंतीसाठी हरसूलजवळील सावरपाडा येथील काही मित्र निघाले. त्यात विकास राऊत हा होता. त्र्यंबकेश्वर परिसरातील एक डोंगरकडा चढताना त्याचे चित्रीकरण करण्यात आले होते. परंतु, त्यानंतर तो कोणाला दिसला नाही. या घटनेला मंगळवारी चार दिवस झाले. त्याचे मित्र त्याची सॅक घेऊन आले. परंतु, त्यांच्याकडून विशेष माहिती न मिळाल्याने पोलिसांनी विकासचे शेवटचे मोबाईल लोकेशन तळेगाव येथे जाऊन चौकशी केली. परंतु, त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही.
विकासबरोबरच्या मित्रांनी तो दुर्गभांडारवरचा डोंगरकडा चढत होता, अशी माहिती दिल्याने हरसूल आणि त्र्यंबकेश्वर येथील दोन पथकांनी मंगळवारी गंगेची मेट, गंगाव्दार आणि परिसरात शोध मोहीम सुरु केली. विकास राऊतच्या शोधासाठी नाशिक येथील वैनतेय गिर्यारोहण गिरीभ्रमण संस्था आणि भोसला ॲडव्हेंचर फाउंडेशन यांचे डोंगर बचाव दलही निघण्याच्या तयारीत असताना हरसूल आणि त्र्यंबकेश्वर येथील स्थानिकांना विकासचा मृतदेह जंगलात सापडल्याची माहिती वैनतेय गिर्यारोहण गिरीभ्रमण संस्थेचे सदस्य आणि डोंगर बचावदल समन्वयक प्रशांत परदेशी यांनी दिली.. विकासचा मृत्यू नेमका डोंगरकड्यावरुन पडून झाला की अजून दुसरे काही कारण असू शकते, याविषयी पोलीस तपासानंतरच कळू शकणार आहे.
