नाशिक : आदिवासी उमेदवारांची पेसा अंतर्गत नोकर भरती करण्यात यावी, यासाठी २१ दिवसांपासून येथे सुरू असलेल्या आंदोलनाची प्रशासकीय पातळीवर दखल घेतली जात नसल्याने बुधवारी आंदोलक आक्रमक झाले. आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या देत प्रशासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला.

राज्यातील १३ जिल्ह्यांत शिक्षण, आरोग्य तसेच कृषीसह अन्य क्षेत्रात पेसा अंतर्गत रिक्त जागांवर अद्याप भरती करण्यात आलेली नाही. याबाबत वारंवार निवेदने, आंदोलन देऊनही योग्य ती दखल घेतलेली नाही. मधल्या काळात स्थानिक लोकप्रतिनिधींनी आंदोलकांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, आंदोलकांनी त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केल्याने त्यांना माघारी फिरावे लागले होते. माजी आमदार जिवा पांडु गावित यांनी आंदोलकांबरोबर जिल्हाधिकारी जलज शर्मा, आदिवासी विभागीय आयुक्त नयना गुंडे यांची भेट घेत निर्वाणीचा इशारा दिला होता. तरीही प्रशासकीय पातळीवर कोणतीही कार्यवाही करण्यात न आल्याने बुधवारी आंदोलक आक्रमक झाले.

हेही वाचा…संजय पांडे विचार मंचाची १० जागा लढण्याची तयारी

आदिवासी विद्यार्थी तसेच आंदोलकांनी मोर्चा काढला. आमदार हिरामण खोसकर यांनीही आंदोलनाला पाठिंबा देत मोर्चात सहभाग घेतला. खोसकर यांनी, आंदोलन वरकरणी २१ दिवसांचे दिसत असले तरी बारा वर्षांपासून आंदोलकांचा संघर्ष सुरू असल्याचे लक्षात आणून दिले. सरकार आदिवासी बांधवांवर अन्याय करत असल्याचा आरोप त्यांनी केला. राज्यातील आदिवासी आमदार आणि खासदार एकत्र आले तर शासनाला जेरीस आणणे कठीण नाही. मात्र आदिवासी लोकप्रतिनिधी एकजूट दाखवत नाहीत, अशी खंत खोसकर यांनी व्यक्त केली. आदिवासी विकास परिषदेचे लकी जाधव यांनी, राज्यातील १३ जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी लढ्यात सहभाग घेतल्याचे सांगितले.. सरकारला आदिवासींशी घेणे-देणे नाही. विद्यार्थी २१ दिवसांपासून आंदोलनात असतानाही दखल घेतली जात नाही. सरकारला अंतिम इशारा असल्याचे जाधव यांनी सांगितले.

दरम्यान, आंदोलकांनी आदिवासी आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय तसेच जिल्हा परिषद या ठिकाणी जात प्रशासनाला निवेदन देत निर्वाणीचा इशारा दिला. यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली. बाहेरगावहून येणाऱ्या वाहनांसह राज्य परिवहन महामंडळाच्या बस अन्य मार्गावरून वळवण्यात आल्या.

हेही वाचा…नाशिक : जलतरण स्पर्धेवेळी विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू, शार्दुल पोळ मूळ पुण्याचा रहिवासी

कळवणजवळ आंदोलन

नाशिक – कळवण मार्गावरील कोल्हापूर फाटा या ठिकाणी आदिवासी संघटनांनी पेसा भरतीसाठी बुधवारी सकाळी ११ वाजेपासून रास्ता रोको केला. या आंदोलनामुळे मार्गावर दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या. आदिवासी बांधवांचा अंत पाहू नका, पेसा क्षेत्राची भरती झालीच पाहिजे, अशा घोषणांनी परिसर दणाणला. आंदोलनास कळवण तालुका भारतीय कम्युनिस्ट पक्ष तसेच राष्ट्रवादी शरद पवार गट, काँग्रेस यांसह सर्व आदिवासी संघटना, आंबेडकर विचार मंच कळवण यांनी पाठिंबा दिला