नाशिक – केंद्रीय भोजन पद्धत बंद करावी, गडचिरोलीतील सर्पदंश झालेल्या विद्यार्थिनींच्या पालकांना एक कोटी रुपयांची मदत द्यावी, आदिवासी विकास मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, यासह इतर मागण्यांसाठी सकल आदिवासी विद्यार्थी आंदोलन कृती समितीच्या वतीने सोमवारी नाशिक ते मुंबई अशा मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चाला परवानगी नसल्याने पोलिसांकडून काही विद्यार्थ्यांची धरपकड करण्यात आली.
राज्यातील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी ठिकठिकाणी वसतिगृह उभारण्यात आले असले तरी वसतिगृहांमध्ये अस्वच्छता, पाण्याची टंचाई आणि खाण्यापिण्याच्या दर्जातील घसरण यावर तातडीने सुधारणा करण्यात यावी, केंद्रीय भोजन पध्दतीव्दारे दूरवरुन येणारे शिळे व निकृष्ट अन्न रोखण्यासाठी स्थानिक पातळीवर ताजे अन्न देण्यात यावे, आदिवासी वसतिगृहांमधील व आश्रमशाळांमधील गैरव्यवहार, अनागोंदी कारभार आणि निष्काळजीपणामुळे झालेल्या विद्यार्थ्यांच्या मृत्युंची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, विद्यार्थ्यांवरील अवाजवी नियम, शुल्क किंवा देणगी वसुलीवर कारवाई आणि विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचे योग्य निकष पाळण्यात यावेत, निष्क्रिय अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, या मागण्याही आदिवासी विद्यार्थी आंदोलकांनी केल्या आहेत.
येथील ईदगाह मैदानात ४० दिवस धरणे आंदोलन केल्यानंतर ‘सकल आदिवासी विद्यार्थी आंदोलन कृती समिती’च्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी नाशिक ते मुंबई (राजभवन) असा मोर्चा सुरु केला. दरम्यान, या आंदोलनासाठी पोलिसांनी परवानगी दिली नसल्याने आंदोलकांना थांबविण्याचा पोलिसांच्या वतीने ठिकठिकाणी प्रयत्न झाला. सोनु गायकवाड, जयेश ठाकरे, विवेक गावित, विकी मुंजे, जीवन भोये यांच्यासह काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. आंदोलकांना नंतर समज देत सोडण्यात आले. सायंकाळी मोर्चा महामार्गावरील विल्होळी परिसरात मुक्कामी थांबला.
आंदोलनामुळे वाहतुक मार्गात बदल
सकल आदिवासी विद्यार्थी आंदोलन कृती समितीच्या वतीने सोमवारी नाशिकहून मुंबईच्या दिशेने मोर्चेकऱ्यांनी कुच केली. या मोर्चात १०० हून अधिक विद्यार्थी सहभागी झालेत. या मोर्चामुळे वाहतुक खोळंबा होऊ नये या करता पोलीसांनी वाहतुक मार्गात बदल करण्यात आला. या मुळे वाहतुक कोंडी झाली नाही. सायंकाळी उशीराने मोर्चा नाशिकच्या वेशीवर धडकला असता वाहतुक काही काळ खोळंबली.
पुन्हा एकदा आंदोलन..
आदिवासी विद्यार्थ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी मागील सहा महिन्यात तिसऱ्यांदा आंदोलन केले आहे. या आंदोलकांची लोकप्रतिनिधी आ. हिरामण खोसकर, अन्न व आैषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, कॉग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विजयकुमार वड्डेटीवार आदींनी भेट घेतली. आंदोलकांनी अन्न त्याग आंदोलन केले. मात्र आंदोलकांची ढासळती प्रकृती व राज्य शासनाकडून आश्वासनांचा पडणारा पाऊस पाहता आंदोलन तुर्तास स्थगित करण्यात आले होते. मात्र राज्य शासनाने ठोस पाऊले न उचलण्याने मुंबईच्या दिशेने मोर्चा निघाला.
