नाशिक – आश्रमशाळांसह वसतिगृहांमध्ये असलेली दुरावस्था, स्वच्छतागृहसह सुरक्षा, वैद्यकीय असुविधा यांच्याविषयी वारंवार तक्रार करुनही आदिवासी विकास विभागाकडून होणाऱ्या दुर्लक्षामुळे नाईलाजाने आंदोलनाच्या माध्यमातुन आवाज उठवावा लागत असल्याची व्यथा आदिवासी विद्यार्थ्यांनी येथे लोकसभेतील विरोधी पक्षनेते तथा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यासमोर मांडली. याबाबत राज्य काँग्रेस कार्यकारिणीशी पत्रव्यवहार करण्याची सूचना विद्यार्थ्यांना करण्यात आली. लवकरच राज्यातील वेगवेगळ्या वसतिगृहांची पाहणी करण्यात येईल, असेही गांधी यांनी विद्यार्थ्यांना आश्वस्त केले.
शहरातील ईदगाह मैदानावर १२ दिवसांपासुन आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. आंदोलनस्थळी कॉग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विजय वडेट्टीवार यांच्यासह अन्य नेत्यांनी भेट देत विद्यार्थ्यांशी चर्चा केली आहे. बुधवारी नाशिक येथे आलेले राहुल गांधी यांची आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. गांधी यांनी दीड तासांहून अधिक वेळ विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांनी अडचणींचा पाढा वाचला. राज्यातील आश्रमशाळांमध्ये ५९२ विद्यार्थ्यांचा मृत्यू झालेला असून विद्यार्थ्यांच्या कुटूंबियांना नुकसान भरपाई आणि अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात यावे, आश्रमशाळांमधील संशयास्पद मृत्यू आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेतील त्रुटीं पाहता आदिवासी विकास मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी सेंट्रल किचन व्यवस्था बंद करून ताजे अन्न द्यावे, विद्यार्थ्यांकडून देणगीच्या नावाखाली पैसे घेतले जात असल्याने विद्यार्थ्यांची होणारी लूट थांबवावी, अशा मागण्या केल्याचे प्रशांत पावरा या विद्यार्थ्याने सांगितले.
लढा उभारण्याची गरज
आदिवासी विद्यार्थ्यांशी इतर विद्यार्थीही यावेळी उपस्थित होते. विद्यार्थ्यांचे प्रश्न रास्त असून यासंदर्भात राज्यस्तरावर लढा उभारण्याची गरज राहुल गांधी यांनी मांडली. आंदोलक विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यात येतील. त्यासाठी राज्य कार्यकारिणीकडे निवेदन देण्याची सूचना गांधी यांनी केली. राहुल पावरा, सागर पावरा, प्रशांत गावडे, सचिन पावरा, अरूण पावरा, विवेक गावित, लक्ष्मी जाधव, धनुश्री पराडके, नीलम कुवर, सोनीराम गायकवाड, वैष्णवी किल्लर या विद्यार्थ्यांचा शिष्टमंडळात समावेश होता.
