नाशिक – त्र्यंबकेश्वर तालुक्यातील मौजे दापुरे येथे होणारा बालविवाह रोखण्यात प्रशासन आणि स्थानिक यंत्रणांना यश आले. मात्र या घटनेमुळे छुप्या पध्दतीने होणारे बालविवाह समस्या ठळकपणे समोर येत आहे.

दापुरे येथे अल्पवयीन मुलीचा विवाह होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर यंत्रणा सक्रिय झाली. जिल्हा महिला व बालविकास विभाग, घोटी पोलीस, ग्राम बाल संरक्षण समिती तसेच ग्रामस्तरीय कर्मचारी यांच्या संयुक्त पथकाने नियोजित विवाहस्थळी भेट दिली. मुलीचे पालक आणि होणारा वर यांना बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार असलेल्या दंडात्मक तरतुदी, कायदेशीर परिणाम तसेच अल्पवयीन विवाहामुळे होणारे सामाजिक व आरोग्यविषयक दुष्परिणाम याबाबत माहिती देण्यात आली. प्रशासनाने संयमित पद्धतीने केलेल्या समुपदेशनामुळे संबंधित कुटुंबियांनी परिस्थितीची गंभीरता ओळखून विवाह सोहळा रद्द करण्यास सहमती दर्शवली.

विवाहासाठी उभारलेला मंडप, वाद्यसामग्री अन्य तयारी तत्काळ हटविण्यात आली. वऱ्हाडी मंडळींनाही परत पाठविण्यात आले. या कारवाईत झारवड बुद्रुकचे ग्रामपंचायत अधिकारी तसेच बालविवाह प्रतिबंधक अधिकारी स्वप्निल पाटील यांनी प्रमुख भूमिका बजावली. माजी सरपंच चंदर लोभी, माजी उपसरपंच सोमनाथ बोराडे, सामाजिक कार्यकर्ते मनोज बोराडे, मुख्य सेविका श्वेता गडाख तसेच घोटी पोलीस ठाण्याचे निरीक्षक शिंदे-पाटील, उपनिरीक्षक उदय पाटील आणि बीट हवालदार बाळासाहेब आहेर यांनी मोलाचे सहकार्य केले. त्यांना ग्राम बाल संरक्षण समिती, ग्रामस्तरीय कर्मचारी, अंगणवाडी सेविका तसेच स्थानिक ग्रामस्थांची मदत मिळाली. मुलाच्या गावातील परिस्थिती लक्षात घेऊन समुपदेशनासाठी ग्रामपंचायत अधिकारी शरद आव्हाड यांनीही सहकार्य केले.

ही कारवाई जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. वर्षा फडोळ, प्रशासक संदीप खैरनार तसेच गटविकास अधिकारी रविकांत सानप यांचेही मार्गदर्शन लाभले. दरम्यान, नाशिक जिल्हा परिसरात वर्षभरात २५ हुन अधिक बालविवाह रोखण्यात यश आले आहे. प्रशासकिय पातळीवर बालविवाह रोखण्याची जबाबदारी ही स्थानिक पातळीवर आशा, अंगणवाडी सेविका यांच्यावर देण्यात आली आहे. ग्रामपंचायत सभासदांनाही या घडामोडींवर लक्ष ठेवण्याचे आदेश आहे. लवकरच अक्षय्य तृतीया येणार आहे. या दिवशी लग्नासाठी मुहूर्त पाहिला जात नसल्याने अनेक ठिकाणी विवाह होतात. या मध्ये बाल विवाह होऊ नये याकरता प्रशासन प्रयत्नशील आहे.