नाशिक : आगामी कुंभमेळा काळात होणारी गर्दी पाहता कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाकडून सतर्कता बाळगण्यात येत आहे. प्रशासनाच्या वतीने त्र्यंबकेश्वर दर्शनासाठी पथ तयार करण्यात येत आहे. या दर्शनपथ मार्गासाठी त्र्यंबकेश्वरमधील अनेक सरकारी कार्यालय, रुग्णालयांचे स्थलांतर करावे लागणार आहे.
त्र्यंबकेश्वर येथील ग्रामीण रुग्णालय स्थलांतरीत करण्यास नागरिकांचा विरोध वाढत असल्याने वरिष्ठ पातळीवरून येणाऱ्या निर्णयाकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. त्र्यंबकेश्वर परिसराचा विस्तार पाहता कुंभमेळ्यासह अन्य काळात भाविकांची होणारी गर्दी पाहता त्र्यंबकेश्वर येथे दर्शनपथ मार्ग करण्यात येत आहे. त्र्यंबकेश्वर येथील तहसील कार्यालयापासून हा मार्ग तयार होत आहे. या मार्गावर तहसील कार्यालय, ग्रामीण रुग्णालय , स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा यासह अन्य काही कार्यालये तसेच अमृतकुंभ धर्मशाळा, पंचायत समिती कार्यालय आणि काही लोकांची घरेही येतात. त्यामुळे शासकीय कार्यालये अन्य ठिकाणी स्थलांतरीत करण्यात येणार आहेत.
अंजनेरी परिसरात असलेल्या शासकीय जागेत ही सर्व शासकीय कार्यालये स्थलांतरीत करण्यात येणार आहेत. ही सर्व कामे कुंभमेळा सुरू होण्याआधी म्हणजे २०२६ मध्ये पूर्ण करायची आहेत. ग्रामीण रुग्णालयाचे इतरत्र स्थलांतर करण्यास स्थानिकांचा विरोध आहे. त्र्यंबकेश्वर देवस्थाननजीक असलेल्या आंबेडकर चौकात त्र्यंबकेश्वर ग्रामीण रुग्णालय आहे. त्र्यंबकेश्वर देवस्थानात दर्शनासाठी येणाऱ्या लोकांना आरोग्यविषयक काही तक्रार असल्यास त्यांनारुग्णालय जवळ असल्याने आधार आहे. तसेच हे रुग्णालय गावाच्या मध्यवर्ती भागात असल्याने अनेकांना या ठिकाणी ये-जा करणे सोपे होते.
या ठिकाणी गरोदर मातांसह नवजात शिशुंनाही उपचाराची व्यवस्था करण्यात आली आहे. आपत्कालीन परिस्थितीत प्राथमिक उपचारानंतर या ठिकाणाहून रुग्णांना नाशिक जिल्हा रुग्णालयात पाठविले जाते. ग्रामीण रूग्णालय अन्य ठिकाणी स्थलांतरीत झाल्यास सर्वांची गैरसोय होणार आहे. अशा स्थितीत हे रुग्णालय अन्यत्र हलविण्यात येऊ नये, अशी मागणी जोर धरत आहे याविषयी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप सूर्यवंशी यांनी माहिती दिली. त्र्यंबक ग्रामीण रुग्णालयात ५० खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी बाह्यरुग्ण तसेच अंतर्गत विभाग आहे. गरोदर मातांसाठी प्रसूती कक्ष, नवजात शिशुंना आरोग्यविषयक त्रास होत असल्यास अतिदक्षता उपचार केंद्र आहे. दर्शन पथसाठी रुग्णालय अन्य ठिकाणी हलविण्यात येणार आहे. याबाबत वरिष्ठ पातळीवरून अद्याप सूचना आलेली नसल्याचे डाॅ. सूर्यवंशी यांनी नमूद केले.
त्र्यंबकेश्वर शहरात कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर दर्शनपथ तयार करण्याची योजना आहे. या पथ मार्गात काही शासकीय कार्यालये, घरे तसेच काही खासगी आस्थापने आहेेत. ग्रामीण रुग्णालयाचे इतरत्र स्थलांतर करावे लागणार आहे. त्यास स्थानिकांचा विरोध आहे.
