नाशिक – बारा ज्योर्तिलिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळा कामांची लगबग सुरु आहे. कुंभमेळ्यात भाविकांची होणारी गर्दी तसेच त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्राचा विकास आणि भाविकांच्या दर्शन मार्गतील अडथळे दूर व्हावेत, यासाठी कुंभमेळा प्राधिकरणाकडून दर्शनपथ विकसित केला जात आहे.
कुंभमेळ्यात त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग दर्शनासाठी आणि कुशावर्त कुंडात स्नानासाठी दररोज लाखो भाविक येतात. त्यामुळे मंदिराजवळ होणारी गर्दी नियंत्रित करणे, रांगेची शिस्त राखणे आणि भाविकांना सुरक्षित दर्शन घडविणे, हा दर्शन पथाचा मुख्य उद्देश आहे. बस स्थानक, मुख्य वाहनतळ आणि कुशावर्त कुंडाकडून येणाऱ्या भाविकांना थेट त्र्यंबकेश्वर मंदिराच्या दर्शन रांगेपर्यंत सुरक्षितपणे पोहोचता यावे, यासाठी दर्शनपथ तयार केला जात आहे.
त्र्यंबकेश्वरमधील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी शासनाकडून २७५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून त्यातूनच दर्शनपथ तयार होत आहे. पहिल्या टप्प्यातील दर्शन पथाचे काम सध्या सुरु असून कुंभमेळ्यापूर्वी दर्शन पथाचा पहिला टप्पा पूर्ण करण्याचे नियोजन आहे. उर्वरित कामे सिंहस्थानंतर पूर्ण करण्यात येण्याची शक्यता आहे.
दर्शन पथ अंतर्गत भाविकांसाठी सावलीची सोय, आधुनिक पथदिवे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि आपत्कालीन मार्ग तयार करण्यात येत आहे. पथाच्या बाजूला मोठ्या क्षमतेचे प्रसाधन आणि स्वच्छतागृह उभारले जात आहेत. गर्दीच्या सुरक्षेवर लक्ष ठेवण्यासाठी संपूर्ण मार्गावर स्मार्ट सीसीटीव्ही कॅमेरे आणि उद्घोषणेसाठी डिजिटल यंत्रणा असेल.
दर्शन पथाच्या माध्यमातून पर्यटन आणि वाहतूक व्यवस्थापन, वारसास्थळांचे संरक्षण व संवर्धन, पर्यावरणीय शाश्वतता आणि स्वच्छता व्यवस्थापन, तीर्थक्षेत्राचा विकास यावर काम करण्यात येणार आहे. यामध्ये प्राचीन मंदिरे, कुंड, वाडे आणि ऐतिहासिक वास्तूंचे जतन व पुनरुत्थान , गोदावरी नदी परिसर स्वच्छता, प्रदुषण मुक्तीवर काम करण्यात येणार आहे. बाहेरील गावाहून येणारे भाविक तसेच पर्यटकांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. दरम्यान, दर्शन पथाच्या कामात अडथळा ठरणाऱ्या काही शासकीय इमारती, दुकाने पाडण्यात येत आहेत. त्र्यंबकेश्वरमधील १२७ हून अधिक गाळे दर्शन पथाच्या कामामुळे पाडण्यात आले. पहिल्या टप्प्यात दर्शनपथ मार्गावर तयार होणाऱ्या व्यापारी संकुलात या गाळेधारकांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे.
पहिल्या टप्प्यात काय ?
दर्शन पथाच्या पहिल्या टप्प्यात दर्शन प्रक्रियेला सुटसुटीत आणि सोयीस्कर करण्यासाठी प्रतिक्षागृह, स्वतंत्र पादचारी मार्ग यासह वेगवेगळ्या संकल्पनांवर काम करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात दर्शनपथ, स्तंभ आणि पुतळा, बेसॉल्ट फ्लोरिंग, वाहनतळ आणि स्वागत इमारत, रस्त्यावर भाविक तसेच पर्यटकांना बसण्यासाठी व्यवस्था, पथदीप, स्वागत कमान यावर काम होईल. या मार्गावर शिवकथेचे विविध स्वरूपात दर्शन घडविणारी भित्तीचित्रे, गौतम तलावातील मध्यभागी शिवमूर्ती आणि गंगासागर तलावात संत निवृत्तीनाथ यांची मूर्ती हे आकर्षण ठरणार आहे.
