नाशिक – नाशिक तसेच त्र्यंबकेश्वर या ठिकाणी होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी दोन्ही ठिकाणी विकास कामांनी वेग घेतला असल्याचा दावा होत असतांना प्रत्यक्षात मात्र या कामांनी नागरिक मेटाकुटीस आले आहेत. दोन्ही शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात खोदकाम सुरू असल्याने बाहेरगावहुन येणाऱ्या भाविकांना वेगवेगळ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त कुंड स्वच्छतेसाठी कोरडे करण्यात आले होते. बुधवारी रात्री उशीराने त्यात पाणी सोडण्यात आले.

त्र्यंबकेश्वर परिसरात विकास कामांनी वेग घेतला आहे. या कामांची सुरूवात अतिक्रमण निर्मूलन मोहिमेने झाली. त्र्यंबक देवस्थाननजीक असलेल्या मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमित दुकाने काढण्यात आली. यामध्ये देवस्थानच्या बाजुला असलेले अतिक्रमण काढण्यात आल्याने मंदिराचा श्वास मोकळा झाला. त्र्यंबकेश्वर गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. यासाठी संत निवृत्तीनाथ देवस्थान समोरील रस्ता, वेगवेगळ्या आखाड्याकडे जाणारे रस्ते, जुने तहसील कार्यालय परिसरासह वेगवेगळ्या ठिकाणी खोदकाम सुरू आहे. कुंभमेळ्याच्या कामासाठी त्र्यंबक नगरपरिषद, कुंभमेळा प्राधिकरण यासह वेगवेगळ्या यंत्रणा काम करीत आहेत. दुसरीकडे, अहिल्या, गोदावरी काठावरील दुकाने काढण्यात आली.

अहिल्या-गोदाकाठ संगमावर नारायण नागबळी पूजेसाठी तयार करण्यात आलेले शेड काढण्यात येत आहे.त्र्यंबकेश्वरमधील जुने जवाहरलाल नेहरू व्यापारी संकुलही पाडण्यात येणार आहे. याबाबत नुकतीच नगर परिषदेत व्यापाऱ्यांबरोबर बैठक पार पडली. कुशावर्त येथेही कामे सुरू आहेत. जेसीबीने केलेल्या कामांमध्ये जलवाहिन्या फुटल्या आहेत. काही ठिकाणी गटारीचे पाणी रस्त्यावर आले. अशा दुर्गंधयुक्त वातावरणात भाविकांना ये-जा करावी लागत असून स्थानिकांच्या रोषाला नगरपालिका प्रशासनाला जावे लागत आहे. अतिक्रमित बांधकामांच्या विटा, पडलेल्या भिंती असे सामान त्याच ठिकाणी असल्यानेही अडथळा निर्माण होत आहे. हा सर्व अडथळा पार करुन त्र्यंबकेश्वर मंदिर, संत निवृत्तीनाथ देवस्थान गाठावे लागत आहे. कुशावर्त कुंडात जल योजनेच्या कामामुळे पाणी बंद करावे लागले होते. त्यामुळे दोन दिवस भाविकांना कुशावर्त कुंडातील स्नानापासुन वंचित रहावे लागले.

त्र्यंबकेश्वर नगरीत सावळा गोंधळ असतांना नाशिक -त्र्यंबक रस्त्याचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. महिरावणी ते पहिनेपर्यंत रस्ता एका बाजुने बंद असून एकाच मार्गिकेतून दुतर्फा वाहतूक सुरू आहे. अवजड वाहनांसह प्रवासी वाहनांची या रस्त्याने ये-जा होत असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. या रस्त्यावर बांधकामाचे साहित्य, पाण्याचे टँकर उभे असल्याने वाहतुकीचा खोळंबा होतो. प्रशासनाच्या या ढिसाळ कामाविषयी बाहेरगावहून येणारे पर्यटक, स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली.