नाशिक – आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याची सुरुवात धर्मध्वज अनावरण सोहळ्याने होणार आहे. या अनुषंगाने गुरुवारी कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते कुशावर्त तीर्थावर ध्वजस्तंभाचे पूजन करण्यात आले. या सोहळ्यासाठी स्थानिक नगरसेवकांना आमंत्रण दिले नव्हते, तसेच ध्वजस्तंभावर पुरोहित संघाचे बोधचिन्ह वापरण्यात आले. या एकूणच नियोजनावर स्थानिकांनी आक्षेप घेतला आहे. शनिवारी त्र्यंबकेश्वर येथे धर्मध्वज अनावरण सोहळ्याच्या नियोजनासंदर्भात बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीवर या वादाचे सावट आहे.

गुरुवारी धर्मध्वजस्तंभ पूजन सोहळा कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत पार पडला. पुरोहित संघाच्या वतीने या सोहळ्याचे नियोजन करण्यात आले होते. या संदर्भात पुरोहित संघाचे सदस्य तसेच पुरस्कृत नगरसेवक सचिन दीक्षित यांच्या वतीने केवळ समाजमाध्यमांवरून आमंत्रण देण्यात आले. नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार यांना निमंत्रण देण्यात आले. मात्र, नगरसेवकांना समाजमाध्यमांवरून ऐनवेळी निमंत्रण देण्यात आले. या कार्यक्रमावर नगरसेवकांनी बहिष्कार टाकण्याचे ठरवले होते. मात्र, नगरसेवक तसेच पुरोहित संघाचे सदस्य प्रशांत गायधनी यांनी पुरोहित संघाच्या वतीने वैयक्तिक विनंती करत कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच गालबोट लागू नये, असे सांगत नगरसेवकांची मनधरणी केली. त्यामुळे उशिराने का होईना, नगरसेवक कार्यक्रमस्थळी हजर झाले.

या विषयी बोलताना माजी नगरसेवक समीर पाटणकर यांनी सांगितले की, माजी उपनगराध्यक्षा वेदिका पाटणकर यांच्यासह अन्य नगरसेवकांना कार्यक्रमाचे आमंत्रण नसल्याने आम्ही कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. पुरोहित संघाचा सदस्य असूनही कार्यक्रम आपल्या नातेवाइकांना हाताशी धरून कंपूशाही निर्माण करत घेण्यात आला. याचा आम्ही निषेध व्यक्त करत असल्याचे पाटणकर यांनी नमूद केले.सोहळ्याच्या निमंत्रणावरून मानपानाचे नाट्य रंगले असताना ध्वजस्तंभावर पुरोहित संघाच्या बोधचिन्हाचा वापर झाल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.

आरोप-प्रत्यारोप…

सामाजिक कार्यकर्त्या ललिता शिंदे यांनी बोधचिन्हाच्या वापरावर आक्षेप नोंदवला आहे. हा कार्यक्रम सर्वांचा असून, पुरोहित संघाने त्याचा स्वतःच्या मालकीच्या कार्यक्रमाप्रमाणे उपयोग करून घेतला, असा आक्षेप त्यांनी घेतला. या विषयी बोलताना पुरोहित संघाचे अध्यक्ष मनोज थेटे यांनी हे सर्व आरोप फेटाळले. ध्वजस्तंभावर राज्य शासनाची प्रतिमा असून, त्यात काहीही गैर नाही. मागील कुंभमेळ्यातही येथील स्तंभावर पुरोहित संघाचे नाव होते. बोधचिन्ह नोंदणीकृत असल्याने ते स्तंभावर रेखाटण्यात आले. त्यात कोणताही बदल केलेला नाही. ध्वजारोहणाची परंपरा केवळ नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे आहे; अन्य कोठेही नाही. नगराध्यक्षांना मानाचे स्थान दिले. कोणालाही डावलले नाही. कार्यकारिणी सदस्यांकडून निमंत्रणे देण्यात आली होती, असा दावा थेटे यांनी केला.