नाशिक : संत निवृत्तीनाथ यांच्या वाड:मयाचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी त्र्यंबकेश्वर येथील श्री संत निवृत्तीनाथ देवस्थानच्या वतीने सरकारकडे निधी मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू होते. राज्य शासनाच्या चौथ्या विश्व मराठी संमेलनात संस्थानला २५ लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. सद्यस्थितीत देवस्थानच्या वतीने प्राप्त निधीतून छापील साहित्यासह वेगवेगळ्या माध्यमातून निवृत्तीनाथ महाराज यांचे साहित्य सर्वदूर पोहचावे यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.
विश्व मराठी संमेलनात संत निवृत्तीनाथ देवस्थानच्या विश्वस्थांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत २५ लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. निधी प्राप्त झाल्यानंतर देवस्थानच्या वतीने साहित्य प्रकाशनासाठी काम सुरू केले आहे. या अंतर्गत संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांच्या अभंग गाथेसाठी तसेच इतर त्यांचे काही अप्रकाशित साहित्य प्रकाशित करण्यासाठी तसेच तत्सम बाबींसाठी निधीचा उपयोग करण्यत येणार आहे. या निधीचे योग्य नियोजन होण्यासाठी संस्था प्रयत्नशील आहे. संत निवृत्तीनाथांची केवळ अभंगगाथाच नसून त्यांचे निवृत्तीसार, समाधिबोध, पंचीकरण, उत्तर भगवद्गीता टीका इत्यादी काही ग्रंथ आणि त्याबरोबर निवृत्तीनाथांचा चरित्रग्रंथ लवकरच प्रकाशित होणार असून त्याचे लेखन संस्थांनचे विश्वस्त प्रा. डॉ. अमर ठोंबरे हे करत आहेत. कुंभमेळ्याचे औचित्य साधून त्यावर वैष्णव व शैव भक्तीचा एक चांगला समन्वय ग्रंथाच्या माध्यमातून दिसेल अर्थात निवृत्तीनाथांच्या तत्त्वज्ञानपर असणाऱ्या ग्रंथांमधून याचा संदर्भ घेतला जाणार असल्याची माहिती डॉ. ठोंबरे यांनी दिली.
निवृत्तीनाथ अभंगगाथेची आणि त्यांच्या चरित्राबद्दलची देखील माहिती एका पुस्तिकेच्या माध्यमातून शाळा महाविद्यालयांमध्ये वितरित करण्याचा मानस संस्थांनने व्यक्त केला आहे. यातूनच या उपलब्ध निधीचे नियोजन देखील होणार असून भावी काळात निवृत्तीनाथांच्या वाड:मयाचा प्रचार आणि प्रसाराच्या दृष्टीने वारकऱ्यांच्या सहयोगातून काम हाेणार आहे. याविषयी देवस्थानचे अध्यक्ष ॲड. सोमनाथ घोटेकर यांनी माहिती दिली.
देवस्थानच्या वतीने छापील साहित्यासह देवस्थानच्या दर्शन बारी या ठिकाणी संत निवृत्तीनाथ यांचे अभंग भिंतीमध्ये मार्बलच्या माध्यमातून कोरण्यात येणार आहेत. काही ठिकाणी चित्रे काढण्यात येणार आहेत. कुंभपर्व सुरू होण्याआधी ही कामे पूर्ण होतील, असा विश्वास ॲड. घोटेकर यांनी व्यक्त केला.
