नाशिक : त्र्यंबकेश्वर येथे आयोजित धर्मध्वजारोहण सोहळा निश्चित मुहूर्तावर आणि निर्विघ्नपणे पार पडावा, यासाठी प्रशासनाने अखेरच्या क्षणापर्यंत कसोशीने प्रयत्न केले. कुशावर्त तीर्थ परिसरात शनिवारी सकाळपासूनच मंगलमय आणि चैतन्यमय वातावरणात सोहळ्याची तयारी करण्यात आली होती. आकर्षक फुलांची सजावट, शंखनाद आणि भजनांच्या सुरांनी संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता.
कुंभमेळा प्राधिकरण, त्र्यंबक नगरपालिका आणि पुरोहित संघ यांच्या सहकार्याने कुशावर्त तीर्थ परिसरात या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे वातावरण अधिक उत्साही आणि मंगलमय करण्यासाठी शंखनाद पथक तसेच भजनी मंडळांना आमंत्रित करण्यात आले होते. कुशावर्त परिसरासह मंदिराभोवतालच्या परिसरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. शहरातील विविध चौकही सजविण्यात आले होते.
मात्र, सोहळ्याच्या पूर्वसंध्येला झालेल्या पावसामुळे सजावटीसह तयारीवर काही प्रमाणात परिणाम झाला. त्यामुळे प्रशासन आणि संबंधित यंत्रणांची धावपळ उडाली. रात्री उशिरापर्यंत काम सुरू ठेवून दुसऱ्या दिवशी सोहळा नियोजनानुसार पार पडावा, यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले.
दरम्यान, गर्दीचे नियोजन आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने कुशावर्ताकडे येणारे बहुतांश रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले होते. प्रवेशिकांच्या आधारे पोलिसांकडून नागरिकांना कार्यक्रमस्थळी प्रवेश दिला जात होता. मात्र, वाहतूक बदलांबाबत पुरेशी माहिती नसल्याने अनेक नागरिकांचा गोंधळ उडाला. कार्यक्रमस्थळी पोहोचण्यासाठी नागरिकांना पर्यायी मार्गांचा शोध घ्यावा लागला. कामावर जाणाऱ्या नोकरदारांनाही वाहतूक बदलांचा फटका बसला. काही ठिकाणी मार्ग मोकळा करण्यावरून नागरिक आणि पोलिसांमध्ये वादाचे प्रसंग घडले.
दुसरीकडे, बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिसांच्या कामाचे नागरिकांनी कौतुक केले. अनेक नागरिकांनी पोलिसांसाठी चहा आणि अल्पोपाहाराची व्यवस्था करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले.
