नाशिक – सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, त्र्यंबकेश्वर येथील आखाड्यांमध्ये सुविधांच्या कामांकडे दुर्लक्ष झाल्यावरून राज्य सरकार आणि कुंभमेळा आयुक्तांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेणाऱ्या साधू-महंतांचा राग अलीकडेच कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांच्याशी चर्चेनंतर निवळला होता.

आता त्र्यंबकेश्वरमधील सर्व १० आखाड्यांमध्ये विविध कामांचे भूमिपूजन मंत्री महाजन यांच्या हस्ते पार पडले. यावेळी साधू-महंतांनी कुंभमेळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी सर्वेतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

​कुंभमेळा आणि वाद हे पूर्वापार समीकरण आहे. कुंभमेळ्यात कुठल्याही कारणावरून वादाचा कुंभ भरतो. आगामी कुंभमेळ्यास फारसा कालावधी राहिलेला नाही. तरीदेखील आखाड्यांमध्ये कामे सुरू झाली नसल्याने मध्यंतरी त्र्यंबकेश्वर येथील शैवपंथीय आखाड्यांनी रोष प्रकट केला होता. प्रत्येक आखाड्याला पाच कोटींचा निधी देण्याचा त्यांचा आग्रह होता.

प्रजासत्ताक दिनी महाजन यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांचा राग निवळला. त्र्यंबकेश्वरमधील १० आखाड्यांतील सुविधांसाठी ५० कोटी वा ७५ कोटी लागले तरीही अडचण नाही, असे त्यांनी नमूद केले. यानंतर लगोलग त्र्यंबकेश्वरच्या आखाड्यांमधील विकासकामांना सुरुवात करण्यात आली.

​कुंभमेळा प्राधिकरणाच्या वतीने आखाड्यांमध्ये विविध कामांचे भूमिपूजन मंत्री महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. मुख्य कार्यक्रम श्री पंच दशनाम जुना आखाडा येथे झाला. नंतर महाजन यांनी सर्व १० शैवपंथीय आखाड्यांना भेट दिली. नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याचा जागतिक स्तरावर लौकिक होणार आहे. यासाठी सर्वांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे नमूद केले. नाशिक- त्र्यंबकेश्वरचा कुंभमेळा निश्चितच साधू-महंतांसाठी असून त्यांच्या सहभागाशिवाय तो होणे शक्य नाही, असे मंत्री महाजन यांनी नमूद केले. कुंभमेळा नियोजनात सर्व यंत्रणांनी युद्धपातळीवर कामे करावीत; गुणवत्तेत कुठलीही तडजोड होता कामा नये, असे निर्देश दिले.

​आखाडा परिषदेचे महंत हरीगिरीजी महाराज यांनी कामांबद्दल समाधान व्यक्त करून शासनास व प्रशासनास कुंभमेळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. महंत शंकरानंद सरस्वती यांनी साधू-संतांच्या वतीने आभार मानले. सर्वांच्या प्रयत्नातून कुंभमेळा यशस्वीपणे पार पडेल, असा विश्वास व्यक्त केला.

आखाड्यांच्या विकासकामांबरोबरच त्र्यंबकेश्वर येथे उभारण्यात येणाऱ्या घाटाच्या बांधकामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत रवींद्रपुरीजी (निरंजनी आखाडा), महंत हरीगिरी महाराज, कोषाध्यक्ष महंत शंकरानंद सरस्वती, कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. प्रवीण गेडाम, कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार आदी उपस्थित होते.