नाशिक – सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त तीर्थाच्या विकास आणि संवर्धनाच्या कामांना वेग आला आहे. ध्वजारोहणापूर्वी ही कामे पूर्ण व्हावीत, यासाठी बुधवारपासून ३१ ऑक्टोबरपर्यंत कुशावर्त तीर्थ बंद ठेवण्यात येणार आहे.

त्र्यंबकेश्वर परिसरात शिवलिंग दर्शनासह कुशावर्त तीर्थाला विशेष महत्त्व आहे. धार्मिक विधीपूर्वी तसेच विधीनंतर कुशावर्तात स्नान केले जाते. पुरातन कुशावर्त तीर्थ परिसरातील जुन्या चिरेबंदी बांधकामाच्या संवर्धनासाठी पुरातत्त्व विभाग, कुशावर्तमधील पाणी शुद्ध राहावे यासाठी पाणीशुद्धीकरण यंत्रणेसाठी त्र्यंबक नगर परिषद, सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणासह विविध आस्थापनांकडून सध्या कामे सुरू आहेत.

यामध्ये दगडी पायऱ्यांची दुरुस्ती, हेरिटेज रोषणाई, नवीन ध्वजस्तंभ तसेच परिसरातील रस्ते रुंदीकरण आणि अतिक्रमण निर्मूलनाच्या कामांचा समावेश आहे. याच भागातील गंगा-गोदावरी मंदिराचे नूतनीकरणही सुरू आहे. याशिवाय कुशावर्ताजवळील स्वच्छतागृह पाडण्यात आले आहे. मात्र, जलशुद्धीकरण प्रकल्पाचे काम रेंगाळले आहे.

दुसरीकडे, ३१ ऑक्टोबर रोजी सिंहस्थ कुंभमेळ्याचा ध्वजारोहण सोहळा त्र्यंबकेश्वरसह नाशिक येथे आयोजित करण्यात आला आहे. पुरोहित संघ आणि प्रशासनाच्या सहकार्याने हा सोहळा पार पडणार असून, या सोहळ्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासह अन्य मान्यवरांना निमंत्रित करण्यात येणार आहे.

या पार्श्वभूमीवर कामांना वेग आला असला तरी आपत्ती व्यवस्थापनाच्या बैठकीत रेंगाळलेल्या कामांना भाविक आणि पर्यटकांच्या गर्दीमुळे अडथळा निर्माण होत असल्याचे समोर आले. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, ग्रामीण पोलीस अधीक्षक स्वामी आणि अन्य पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत कुशावर्त तीर्थ बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

कामांची संथ गती, कुशावर्तावर भाविकांसह पर्यटकांची असलेली वर्दळ आणि त्यांची सुरक्षितता या पार्श्वभूमीवर कुशावर्त तीर्थ बुधवारपासून ३१ ऑक्टोबरपर्यंत बंद राहणार आहे.दरम्यान, प्रशासनाच्या या निर्णयामुळे ऐन पितृपक्षात श्राद्धविधीसाठी येणाऱ्या भाविकांना कुशावर्तात स्नान करता येणार नाही. तसेच विधी कुठे करायचे, हा प्रश्नही निर्माण झाला आहे. त्यामुळे पुरोहित वर्गाकडून पर्यायी ठिकाणांची निवड केली जात आहे.

सध्या कुशावर्त बंद असल्याने पितृपक्षातील श्राद्धविधी तसेच अन्य विधी अहिल्या-गोदावरी संगम घाटावर केले जात आहेत. कुशावर्तावर होणारे काही विधी पर्याय म्हणून कृष्ण मंदिर, इंद्राळेश्वर मंदिर, सत्यनारायण मंदिर तसेच नियोजित विधी भवन येथे केले जात आहेत. मात्र, बाहेरून येणाऱ्या भाविकांना याची फारशी कल्पना नसल्याने बंद कुशावर्तावरील बॅरिकेडिंग पाहून अनेकांना माघारी फिरावे लागत आहे.