नाशिक – विशिष्ट लाकडी खांब आणि दोरीवर केल्या जाणाऱ्या मल्लखांबच्या कसरतींचे प्रशिक्षण शहरात सहजपणे मिळू शकते. परंतु, ग्रामीण भागात वेगळी स्थिती असते. तिथे नियमित प्रशिक्षण मिळणे जिकिरीची बाब. अशा परिस्थितीत ग्रामीण भागात, त्र्यंबकेश्वरसारख्या तीर्थक्षेत्री राजा शिवछत्रपती व्यायामशाळेच्या पुढाकारातून प्रशिक्षणाची खास व्यवस्था झाल्यामुळे केवळ मुलेच नव्हे तर, मुलींचीही पाऊले मल्लखांब प्रशिक्षणासाठी व्यायामशाळेकडे पडू लागल्याचे आशादायक चित्र समोर आले आहे.

कधीकाळी कुस्तीसाठी पूरक व्यायाम म्हणून मल्लखांबकडे पाहिले जात असे. आता तो स्वतंत्र क्रीडा प्रकार झाला आहे. कुस्तीप्रमाणेच ज्युदो, ॲथलेटिक्स, जिम्नॅस्टिक्स, घोडदौड आदी अनेक खेळांत हा व्यायाम प्रकार उपयुक्त ठरतो. त्र्यंबकेश्वरमध्ये रंगपंचमीला व्यायामशाळेची मल्लखांबाची गाडी काढण्याची पूर्वापार परंपरा आहे. १९७२ मध्ये ही प्रथा बंद पडली होती.

परंतु, कै. डॉ. नानासाहेब (ज्ञानेश्वर) शुक्ल आणि नेपथी शर्मा उर्फ मास्टर शुक्ल यांनी पुढाकार घेऊन ही प्रथा पुन्हा सुरू केली. तेव्हापासून राजा शिवछत्रपती व्यायामशाळा दरवर्षी रंगपंचमीच्या दिवशी ट्रॅक्टरवर मल्लखांबचा संच बसवून संपूर्ण गावात मल्लखांबचे प्रात्यक्षिक सादर करते. यंदा मुला-मुलींनी सादर केलेल्या मल्लखांबच्या प्रात्यक्षिकांनी प्रशिक्षणाचे महत्व अधोरेखीत झाले.

यात मुलांनी लांकडी खांबावर मुलींनी दोरीच्या मल्लखांबवर प्रात्यक्षिके सादर केली. यात विविध प्रकारचे मनोरे आणि आसनांचा समावेश होता. चक्र, बन्नाटे तसेच तलवार, दांडपट्टा याचीही प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. मिरवणुकीत अनेक व्यायामपटू, कुस्तीगीर, शरीरसौष्ठवपटूंनी आपले कौशल्य दाखवले. लहान मल्लखांबपटूंनी सादर केलेल्या प्रात्यक्षिकांचे त्र्यंबकेश्वरवासीयांसह भाविकांनी कौतुक केले.मिरवणूक यशस्वी करण्यासाठी ज्येष्ठ मार्गदर्शक विष्णूपंत गाजरे (वस्ताद), पहिलवान केतन लोया, अभिषेक कोकणे, राहुल पाटील, रामा परदेशी, सुरेंद्र शुक्ल, सचिन आणि महेश पाचोरकर आदींनी मेहनत घेतली.

८० हून अधिक मुला-मुलींना प्रशिक्षण

कुशावर्त तीर्थापासून अगदी जवळ राजा शिवछत्रपती व्यायामशाळा आहे. या ठिकाणी ४० लहान मल्लखांबपटू आणि जवळपास तितक्याच मुली नियमितपणे मल्लखांबाचे प्रशिक्षण घेत आहेत. मुला-मुलींना खांब आणि दोरी या दोन्ही प्रकारातील प्रशिक्षण दिले जाते. त्र्यंबकेश्वर नगरीची अनेक वैशिष्ठ्ये आहेत. रंगपंचमीला मल्लखांब गाडीची मिरवणूक ही परंपरा राजा शिवछत्रपती व्यायामशाळेने आजवर जपली.

गावातील विद्यार्थ्यांना मल्लखांब प्रशिक्षण देण्यासाठी व्यायामशाळेची धुरा सांभाळणारे सत्यप्रिय शुक्ल यांनी नाशिकहून महिला प्रशिक्षकास निमंत्रित केले. मल्लखांब प्रशिक्षक म्हणून मिथिला पैठणकर आणि राजू गांगुर्डे हे काम बघतात. दररोज सायंकाळी बालगोपाळ मल्लखांबपटूंनी व्यायामशाळा गजबजलेली असते. मल्लखांबपटूच्या आहाराबाबत पालकांशी चर्चा केली जाते.

मल्लखांबमुळे संपूर्ण शरिराचा व्यायाम होतो. त्यामुळे ऊर्जा, मनाची एकाग्रता वाढीस लागते. फारसा खर्चिक नसणारा, नियमित आहारात करता येणारा हा उत्कृष्ट व्यायाम प्रकार मानला जातो. त्र्यंबकेश्वरमध्ये मुलांबरोबर मुलींनाही मल्लखांबचे प्रशिक्षण देण्यासाठी व्यायामशाळेने खास महिला प्रशिक्षकांची नियुक्ती केली. मल्लखांब प्रशिक्षणासाठी मुली व्यायामशाळेत मोठ्या संख्येने येत असून ही मोठी गोष्ट आहे.

  • सत्यप्रिय शुक्ल (प्रमुख, राजा शिवछत्रपती व्यायामशाळा, त्र्यंबकेश्वर)