नाशिक – पितृपक्ष सुरू असल्याने राज्यासह देशाच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने भाविक त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल होत आहेत. श्राद्ध तसेच अन्य धार्मिक विधींसाठी त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांची गर्दी वाढली आहे. धार्मिक विधींनंतर ही गर्दी त्र्यंबकराजाच्या दर्शनासाठी वळत असल्याने मंदिर प्रशासनावर ताण येत आहे. या पार्श्वभूमीवर भाविकांची दर्शन व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी देवस्थानच्या वतीने ३ ते १२ ऑक्टोबर या कालावधीत व्हीआयपी दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त तीर्थ, अहिल्या-गोदा संगम आदी ठिकाणी पितृपक्षातील विधी, नारायण नागबळी, त्रिपिंडी श्राद्ध यासह विविध धार्मिक विधी केले जातात. पितृपक्ष सुरू असल्याने या ठिकाणी भाविकांसह नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्यांमुळे गर्दीत आणखी वाढ होत आहे.
त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल होणारे भाविक धार्मिक विधी केल्यानंतर बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकराजाच्या दर्शनासाठी मंदिराकडे वळत आहेत. त्यामुळे मंदिर परिसरातील गर्दीचे नियोजन करताना प्रशासनावर अतिरिक्त ताण येत आहे. सर्वसामान्य भाविकांना रांगेत उभे राहूनही दर्शन घेण्यासाठी अधिक वेळ लागत आहे. या पार्श्वभूमीवर, गर्दीच्या काळात भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी आणि दर्शन व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी देवस्थानच्या विश्वस्त मंडळाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत ३ ते १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
मात्र, केंद्र शासन, राज्य शासन किंवा जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून प्राप्त होणाऱ्या राज्य शिष्टाचारासंबंधीच्या लेखी पत्रव्यवहारानुसार असलेल्या अपवादांना हा निर्णय लागू राहणार नाही, असे देवस्थानच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. भाविकांनी या निर्णयाची नोंद घेऊन दर्शन व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन देवस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.
कुशावर्त तीर्थही बंद
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त तीर्थाच्या विकास आणि संवर्धनाच्या कामांना वेग आला आहे. ध्वजारोहणापूर्वी ही कामे पूर्ण व्हावीत, यासाठी बुधवारपासून ३१ ऑक्टोबरपर्यंत कुशावर्त तीर्थ बंद ठेवण्यात येणार आहे. धार्मिक विधीपूर्वी तसेच विधीनंतर कुशावर्तात स्नान केले जाते. पुरातन कुशावर्त तीर्थ परिसरातील जुन्या चिरेबंदी बांधकामाच्या संवर्धनासाठी पुरातत्त्व विभाग, कुशावर्तमधील पाणी शुद्ध राहावे यासाठी पाणीशुद्धीकरण यंत्रणेसाठी त्र्यंबक नगर परिषद, सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणासह विविध आस्थापनांकडून सध्या कामे सुरू आहेत. ३१ ऑक्टोबर रोजी सिंहस्थ कुंभमेळ्याचा ध्वजारोहण सोहळा होणार आहे. परिसरातील रेंगाळलेल्या कामांना गर्दीमुळे अडथळा निर्माण होत असल्याने कुशावर्त तीर्थ बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
