नाशिक : नाशिक व त्र्यंबकेश्वरमध्ये होणार्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर कोट्यवधींची विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. त्यामुळे परिसराचा कायापालट होत असल्याने जमिनींमध्ये मोठी गुंतवणूक होऊ लागली असून त्याचे दर गगनाला भिडले आहेत. स्थानिकांनी भाविकांच्या सोयी-सुविधांसाठी आपल्या जागेचा हॉटेल, निवास व्यवस्थेच्या दृष्टीने विकास करण्यावर भर दिल्याचे चित्र आहे.
बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आणि कुंभनगरी म्हणून ओळखल्या जाणार्या त्र्यंबकेश्वरमध्ये पुढील वर्षी होणार्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर कोट्यवधींची विकास कामे हाती घेण्यात आली आहेत. परिसराचा कायापालट होत असल्याने जमीन, भूखंड, शेतघर (फार्म हाऊस), सदनिका यांच्यात मोठी गुंतवणूक होऊ लागल्याने त्यांचे दर वाढले आहेत. स्थानिकांनी भाविकांच्या सोयी-सुविधांसाठी आपल्या जागेचा हॉटेल, निवास व्यवस्थेच्या दृष्टीने विकास करण्यावर भर दिल्याचे चित्र आहे.
नाशिकपासून ३० किलोमीटरवर असणारे त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर कात टाकण्याच्या मार्गावर आहे. सुमारे २० हजार लोकसंख्या असणार्या या नगरीचे आर्थिकचक्र पूर्णत: धार्मिक पर्यटनावर अवलंबून आहे. त्यामुळेच पूजाविधी, हॉटेल, निवास व्यवस्था अशा काही व्यवसायांची भरभराट झाली. कुंभमेळ्यात निवास व्यवस्था, हॉटेल अर्थार्जनाचा महत्त्वाचा स्रोत ठरू शकतो, हे लक्षात घेऊन स्थानिकांसह बाहेरील मंडळी गुंतवणूक करू लागली आहे. या अनुषंगाने त्र्यंबकेश्वरच्या आसपास निवास व्यवस्थेसह हॉटेलांची संख्या वाढत आहे. वास्तविक, ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी वसलेल्या आकाराने लहान त्र्यंबकनगरीला चौफेर विस्ताराला मर्यादा आहे. त्यामुळे गावात कुठे एक-दोन गुंठा जागा मिळणेही अवघड. त्र्यंबक परिसरात सध्या २५ ते ३० लाख रुपये गुंठा दराने जागा मिळत असल्याचे स्थानिक सांगतात. दोन वर्षांपूर्वी हेच दर १० ते १२ लाख रुपये प्रति गुंठा होते.
२०१५-१६ मध्ये त्र्यंबकेश्वरचा विकास आराखडा तयार झाला. गावाची सीमा विस्तारली. नाशिकच्या दिशेने पेगलवाडी, तर जव्हार रस्त्यावरील गणपतबारी, मेढघर किल्ल्यापर्यंत बांधकामे होऊ लागली. त्र्यंबकेश्वरमध्ये दोन्ही बाजुने डोंगर असल्याने तेथील जमिनी आरक्षित करण्यात आल्या. परिणामी, जागेच्या दरात वाढ झाल्याकडे पुरोहित संघाचे विश्वस्त तथा नगरसेवक प्रशांत गायधनी यांनी लक्ष वेधले. त्र्यंबकेश्वरमध्ये कैलासराजा नगर, पुरोहित नगर, दक्षिण मुखी हनुमान मंदिराजवळील भाग नव्याने विकसित झाला. बहुमजली इमारती, रो हाऊसलाही मागणी आली. आसपासच्या जागा बिनशेती होऊन भूखंडांची विक्री जोमात सुरू झाली. मुसळधार पावसाचा हा तालुका असल्याने काही गुंतवणूकदारांनी बेजे, पहिणेसारख्या निसर्गाच्या सान्निध्यात फार्म हाऊस, रिसॉर्टचा विचार केला. अनेक ठिकाणी योग केंद्र, निसर्गोपचार केंद्र दृष्टिपथास पडतात. नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावर शेकडो हॉटेल, रिसॉर्ट, लॉजिंग अर्थात निवास व्यवस्थेच्या सुविधा निर्माण झाल्या. त्र्यंबकनगरीत मोठ्या प्रमाणात होणारी बांधकामे अधिकृत की अनधिकृत, हा प्रश्नही उपस्थित होतो. कारण, नगरपालिकेने बांधकामांना दिलेली परवानगी आणि प्रत्यक्षातील कामे यात तफावत दिसून येते.
त्र्यंबकेश्वर तालुक्यात मागील काही वर्षांत स्थावर मालमत्तेच्या व्यवहारात वाढ झाल्याची आकडेवारी आहे. प्रयागराजमध्ये भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. कुंभमेळ्यासाठी शासन त्र्यंबकेश्वर परिसरात मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा उभारत आहे. त्यामुळे चालू वर्षात स्थानिकांनी आपल्या जागा विकण्याऐवजी त्या स्वत: विकसित करण्याचे धोरण ठेवल्याचे दिसून येते. – सचिन सोनानी, दुय्यम सहायक निबंधक, त्र्यंबकेश्वर
त्र्यंबक नगरीचा विकास होत असताना राज्यातील बड्या व्यावसायिकांचा अद्याप एकही गृहप्रकल्प येथे नाही. नाशिक, जळगावसह स्थानिक बांधकाम व्यावसायिकांनी जानेवारीपासून आतापर्यंत नगरपालिकेकडे १६० गृह प्रकल्पांचे प्रस्ताव सादर केले आहेत. त्यापैकी ५७ प्रस्तावांना मान्यता देण्यात आली आहे. – गोविंद जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी, त्र्यंबकेश्वर नगरपालिका
दस्त नोंदणी किती?
२०२१-२२ – १७०७
२०२२-२३ – १९०६
२०२३-२४ – २४४८
२०२४-२५ – २७०७
२०२५-२६ – २३८५
