नाशिक – नाशिकपाठोपाठ त्र्यंबकेश्वर परिसरात मोठ्या प्रमाणावर रस्ते रुंदीकरण आणि डांबरीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. कुंभमेळ्याच्या अनुषंगाने पहिल्या टप्प्यातील रस्ता रुंदीकरण व अन्य कामे सुरू असल्यामुळे स्थानिकांसह बाहेरून येणारे भाविक वैतागले आहेत. संत निवृत्तीनाथ मंदिर परिसर, धर्मशाळा, जुने तहसील कार्यालय यासह अन्य ठिकाणी खोदकाम सुरू आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर, ही कामे रेंगाळण्याची भीती व्यक्त होत आहे.

​नाशिक तसेच त्र्यंबकेश्वर येथे ठिकठिकाणी रस्ते खोदकाम, रुंदीकरण सुरू आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर परिसरात १७ रस्त्यांचे काम हाती घेण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यातील कामाला सुरुवात झाली आहे. यामध्ये संत निवृत्तीनाथ देवस्थानकडे जाणारा रस्ता, त्र्यंबक देवस्थान मुख्य प्रवेशद्वारासमोरील काही रस्ते, कुशावर्तकडे येणारे काही रस्ते, जुने तहसील कार्यालय, त्र्यंबक पोलीस ठाणे रस्ता यांचा समावेश आहे. ठिकठिकाणी रस्ते खोदण्यात आले आहेत. या खोदकामामुळे काही ठिकाणी जलवाहिन्या, मलवाहिन्या फुटल्या. त्यामुळे गटाराचे पाणी रस्त्यावर येत आहे.

काही ठिकाणी जलवाहिन्या फुटल्याने पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. खोदकाम केलेल्या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. बाहेरगावहून येणाऱ्या नागरिकांना याविषयी फारशी कल्पना नसल्याने खड्डे आणि अडथळ्यांची शर्यत पार करताना त्यांची कसरत होत आहे.

​स्थानिक रहिवासी, व्यावसायिक खोदकामाला वैतागले आहेत. खोदकामाचा परिणाम व्यवसायावर होत असून दुर्गंधीमुळे आरोग्य धोक्यात आले आहे. वास्तविक जूनच्या पहिल्या आठवड्यात पाऊस येण्याचा अंदाज वर्तविण्यात येत असताना पहिल्या पावसात त्र्यंबक नगरी जलमय होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. खोदलेल्या रस्त्यांची कामे अजूनही रखडलेली असल्याने ती रेंगाळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, त्र्यंबक नगरपालिका प्रशासन मात्र ही कामे वेळेत पूर्ण होतील, असा दावा करत आहे.

​नगरपालिकेचे म्हणणे काय?

​सध्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रस्ते रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. १७ रस्त्यांपैकी पाचहून अधिक रस्त्यांचे रुंदीकरण, काँक्रिटीकरण करण्यात येत आहे. या कामामुळे स्थानिक त्रस्त आहेत. पावसाळा सुरू होण्याआधीच किमान रस्ता तयार करून त्यावर सिमेंटचा एक थर होईल. नंतरची कामे ऑक्टोबरनंतर सुरू होतील. हाती घेतलेली कामे पूर्ण करण्यावर भर देण्यात येत असून पावसाळ्याआधीच ही कामे होतील. – गोविंद जाधव (मुख्य कार्यकारी अधिकारी, त्र्यंबकेश्वर नगरपालिका).