नाशिक – केंद्रात व राज्यात हिंदुत्ववादी सरकार असूनही हिंदू धर्मीयांच्या सर्वात मोठ्या कुंभमेळा सोहळ्यात अनास्था दाखवली जात असल्याची तक्रार करीत शासनाचा निषेध करणाऱ्या त्र्यंबकेश्वरमधील साधू-महंतांचा राग अखेर कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्याशी बैठक झाल्यानंतर निवळला आहे.

​आगामी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्यासाठी राज्य व केंद्र सरकारने सुमारे ३० हजार कोटींचा आराखडा तयार केला आहे. पायाभूत सुविधांच्या कामांना सुरुवात झाली असली तरी आखाड्यांशी संबंधित कामे सुरू न झाल्याने साधू-महंत संतप्त झाले होते. त्र्यंबकेश्वरमधील श्री पंचायती निरंजनी आखाड्यात आयोजित बैठकीत शैवपंथीय आखाडे, मठाधिपती व आश्रम प्रमुखांनी कामे रखडण्याचे खापर कुंभमेळा प्राधिकरणावर फोडले. कुंभमेळ्यास फारसा कालावधी बाकी नाही.

आखाड्यांमध्ये पावसाळ्यापूर्वी कामे न झाल्यास देशभरातून येणाऱ्या साधू-संतांची व्यवस्था कशी होईल? असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला. प्रत्येक आखाड्याला पाच कोटींचा निधी देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली होती, परंतु त्याची दखल घेतली गेली नसल्याची तक्रार करण्यात आली. आखाड्यांशी संबंधित कामे त्र्यंबक नगरपालिकेकडून करण्यास साधू-महंतांनी विरोध केला होता. कुंभमेळ्यातील काही कामांवर अनाठायी खर्च केला जात असल्याकडेही काहींनी लक्ष वेधले.

​साधू-महंतांनी आक्रमक भूमिका घेतल्याने कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिक दौऱ्यात हरिगिरी महाराज व साधू-महंतांशी चर्चा केली. कुंभमेळ्यासाठी हजारो कोटींची कामे सुरू झाली आहेत. काही कामांची निविदा प्रक्रिया झाली असून उर्वरित कामे सुरू होण्याच्या मार्गावर आहेत. गैरसमज झाल्यामुळे साधू-महंत नाराज झाले, परंतु आखाड्यातील कुठल्याही कामांना विलंब होणार नाही; सर्व कामे वेळेत पूर्ण केली जातील, असे आश्वासन महाजन यांनी दिले. ही कामे कुणी करावी, याबद्दल महंतांचे म्हणणे जाणून घेण्यात आले. सर्व कामे दर्जेदार होणे महत्त्वाचे आहे.

मागील कुंभमेळ्यात आखाड्यांमध्ये एक कोटींची कामे करण्यात आली होती. यावेळी साधू-महंतांच्या मागणीनुसार निधी वाढवून देण्याची तयारी आहे, असे महाजन यांनी स्पष्ट केले. सिंहस्थ कुंभमेळा साधू-महंतांचा आहे, ते म्हणतील तितका निधी दिला जाईल. त्र्यंबकेश्वरमधील शैवपंथीय १० आखाड्यांतील सुविधांसाठी ५० कोटी वा ७५ कोटी लागले तरीही अडचण नाही, असे मंत्री महाजन यांनी सूचित केले. त्र्यंबकेश्वरमधील शैवपंथीय आखाड्यांसह मठ आणि आश्रमांत सोयी-सुविधांसाठी अपेक्षित निधी दिला जाईल, असे आश्वासन मिळाल्यानंतर साधू-महंतांनी एक पाऊल मागे घेतले. संपूर्ण जगाचे लक्ष असणारा कुंभमेळा यशस्वी करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची असल्याचे यावेळी हरिगिरी महाराज यांनी सांगितले.