नाशिक – श्रावणातील पहिल्या सोमवारी बारा ज्योर्तिलिंगापैकी एक असलेल्या श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे दर्शन घेण्यासाठी शिवभक्तांनी रविवारी सायंकाळपासून गर्दी केली. श्रावणी सोमवार आणि नागपंचमी हा योग जुळून आल्याने शिवभक्तांच्या उत्साहाला उधाण आले. अपेक्षेपेक्षा भाविकांची गर्दी अधिक झाल्याने प्रशासनाचे नियोजन कोलमडले. नाशिक- त्र्यंबकेश्वर रस्त्यावर वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या.

श्रावणात त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी नाशिक जिल्ह्यासह राज्याच्या इतर भागातून गुजरात, दक्षिण, उत्तर भारतातून येणाऱ्या भाविकांची संख्या अधिक आहे. मंदिर व्यवस्थापनाकडून जलरोधक तंबु, भाविकांना बसण्यासाठी व्यवस्था, पिण्याचे पाणी आदी व्यवस्था करण्यात आली. परंतु, मंदिर व्यस्थापनासह प्रशासनाने केलेले नियोजन सपशेल कोलमडले. शनिवार, रविवारची सुट्टी आणि श्रावणी सोमवार यामुळे भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली. खासगी वाहनांसह अन्य प्रवासी वाहनांच्या लांबच लांब रांगा नाशिक – त्र्यंबकेश्वर रस्त्यावर लागल्या. त्र्यंबकेश्वरबाहेर तयार करण्यात आलेल्या वाहनतळासह अन्य ठिकाणी वाहने उभे करण्यास जागा कमी पडली.

दुसरीकडे, त्र्यंबकेश्वर मंदिरात पूर्व दरवाजाबाहेर दर्शनासाठी लागलेली लांबच लांब रांग डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत गेली. भाविकांना किमान सहा ते आठ तास रांगेत उभे रहावे लागले. दूरपर्यंत गेलेली दर्शनरांग पाहून काहींनी मंदिराबाहेरुनच दर्शन घेत परतीचा मार्ग धरला. देणगी दर्शनासाठीही किमान तीन तासांहून अधिक कालावधी लागला. रांगेत उभ्या राहणाऱ्या भाविकांना वेगवेगळ्या अडचणींना तोंड द्यावे लागले. पाऊस, नैसर्गिक विधीसाठी होणारी कुंचबना, सुरक्षारक्षकांची अरेरावी, मंदिराचे ढिसाळ नियोजन याचा फटका भाविकांना बसला.

रस्त्यावरील खड्डे, खोदकाम, दर्शनासाठी झालेला विलंब ही अडथळ्यांची शर्यत पार करत मंदिरात पोहचलेल्या भाविकांना गर्भगृहाच्या गाभाऱ्यातुन क्षणात बाजुला करण्यात येत असल्याने दर्शनाचे समाधानही त्यांना मिळाले नाही. पहिल्या सोमवारी झालेली गर्दी पाहता तिसऱ्या सोमवारी काय होईल, याची अनुभूती भाविकांसह प्रशासनाला आली. रविवारी मध्यरात्रीपासून शिवभक्तींनी श्रावणातील ब्रह्मगिरी प्रदक्षिणेला सुरूवात केली. प्रदक्षिणा मार्गावर सामाजिक संस्था, नागरिकांकडून शिवभक्तांसाठी पाणी, अल्पोहार आदी व्यवस्था करण्यात आली. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या वतीने सायंकाळी पालखी काढण्यात आली.

निसरड्या रस्त्यामुळे दुचाकीचालकांपुढे संकट

नाशिक- त्र्यंबकेश्वर रस्ता काँक्रिटीकरणाचे काम काही महिन्यांपासून सुरु आहे. एका बाजूचा रस्ता पूर्ण होत आला असला तरी दुसऱ्या बाजुच्या रस्त्यावर खड्डे, चिखल पाणी जमा झाल्याने रस्ते निसरडे झाले आहेत. श्रावणी सोमवारनिमित्त त्र्यंबकेश्वरकडे दुचाकीवर जाणाऱ्या वाहनचालकांना या निसरड्या रस्त्यावरील संकटांना तोंड द्यावे लागले. निसरड्या रस्त्यावर अनेक दुचाकी घसरल्याने वाहनचालकांसह त्यांच्याबरोबर असलेले लहान मुले, महिला, वृध्द यांनाही दुखापत झाली. अनेकांना दुचाकीवरून पडल्यानंतर चालणेही अवघड झाले.

राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने श्रावणात त्र्यंबकेश्वर येथे जाण्यासाठी होणारी गर्दी पाहता ६० हून अधिक जादा बसेस सोडण्यात आल्या. खासगी वाहनांना त्र्यंबकेश्वरमध्ये श्रावणातील प्रत्येक सोमवारी प्रवेश बंद करण्यात आला आहे.