नाशिक – ब्रह्मवृंदाचा जयघोष… स्वागतम सुस्वागतम या गीताचे बोल… हर हर महादेवचा नारा, अशा उत्साहपुर्ण वातावरणात त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळा धर्म ध्वजारोहणाचा कार्यक्रम मंगलमय वातावरणात कुशावर्त तीर्थ परिसरात पार पडला.
या सोहळ्यासाठी त्रत्र्यंबकेश्वर नगरी सजली. चौकाचौकात रांगोळ्या काढण्यात आल्या. कार्यक्रमाच्या ठिकाणी जाणारे रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले. चौकाचौकात फुलांची सजावट करण्यात आली. शनिवारी सकाळी १० वाजता पुरोहित संघाच्या वतीने पूजा सुरू झाली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरण तसेच प्रशासनाच्यावतीने पगडीसह मानाचे वस्त्र देत सत्कार करण्यात आला. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्र्यंबकेश्वर येथील सर्व आखाड्यांचे प्रतिनिधी , प्रमुख यांना पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आले. यानंतर मुख्य सोहळ्यास सुरूवात झाली. सोहळा सुरू असतांना नाशिक, पुणे येथील केशवानंद शंख पथकाच्या वतीने शंखनाद करण्यात आला. भजनी मंडळाच्या वतीने मंगलगीते सादर करत वातावरणात रंग भरण्यात आला.
पुरोहित संघाच्या वतीने पूजेवेळी प्रार्थनेसाठी उपस्थित नागरिकांनाही प्रार्थनेत सहभागी करून घेण्यात आले. एक तासांहून अधिक वेळ पूजा सुरू होती. दुपारी १२.०२ मिनिटाच्या मुहूर्तावर मुख्यमंत्री फडणवीस तसेच श्रृंगेरी पिठाचे शंकराचार्य महाराज यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विविध आखाड्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. मंगलमय वातावरणात धर्मध्वजारोहण सोहळा पार पडला.
या सोहळ्यास हरिगिरी महाराज, त्र्यंबकेश्वर नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोविंद जाधव, नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार, पुरोहित संघाचे अध्यक्ष मनोज थेटे, आ. हिरामण खोसकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, कार्यक्रम संपल्यानंतर त्रत्र्यंबकेश्वर येथे बांधण्यात आलेल्या घाट परिसरात पूजनासाठी मुख्यमंत्र्यासह सर्वजण रवाना झाले.
पोलिसांची कसरत
शनिवारी सकाळी सिंहस्थ धर्मध्वजारोहण सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत, दुपारी तीन वाजता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत धर्म ध्वजपूजन यामुळे सुरक्षा व्यवस्थेचा ताण पोलिसांवर आला. कार्यक्रमाच्या ठिकाणी केवळ पास धारकांना प्रवेश असल्याने आगंतुक म्हणून आलेल्या काही हौशी नागरिकांना पोलिसांचा प्रसाद मिळाला. कुशावर्त परिसर नो फ्लाय झोन घोषित करण्यात आला असल्याने पोलिसांंनी अवैधरित्या ड्रोनबाजी टाळण्यासाठी खास एक बंदुक आणली होती.
अघोषित संचारबंदी
कुशावर्तकडे येणारे रस्ते बंद करण्यात आले होते. नागरिकांच्या घरासमोर शोभेच्या पटट्या, दुभाजक लावण्यात आल्याने त्यांच्यासाठी ही अघोषित संचारबंदी राहिली. कार्यक्रम अनेकांनी आपल्या खिडकीतून, सज्जातून पाहिला. बाहेरगावहून आलेल्या भाविक, यात्रेकरूंना याची पूर्वकल्पना नसल्याने त्यांचा खोळंबा ाझाला. उपाहारगृह, हाॅटेल, दुकाने बंद असल्याने कार्यक्रम संपेपर्यंत अ्नेकांना उपवास घडला.
नगरसेवकांची अशी तयारी
त्रत्र्यंबकेश्वरच्या नगरसेवकांसह नगराध्यक्षांनी ध्वजारोहण सोहळ्यासाठी एका रंगातील साड्या, पुरूष मंडळीनी पोशाख ठेवला होता. पुरूष मंडळींनी थ्री पीस तर महिला वर्गाने पैठणी नेसली होती.
