नाशिक – त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वाघेरा ग्रामपंचायत हद्दीतील कोशीमपाड्यास जानेवारी अखेरीस हंडाभर पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. नाशिक जिल्हा धरणांचा जिल्हा म्हणुन ओळखला जात असला तरी जिल्ह्यातील अनेक गावांमधील विहिरी या फेब्रुवारी अखेर तळ गाठतात. यंदा जानेवारी महिन्यातच पाणी टंचाईच्या तक्रारी सुरू झाल्या आहेत.
त्र्यंबकेश्वर येथील भौगोलिक स्थितीचा विचार केला तर त्र्यंबक शहरास आजुबाजुच्या गावांमध्ये पाण्याचा प्रश्न नेहमी चर्चेत राहिला. जवळ काश्यपी, गौतमी धरण असूनही त्र्यंबकचा पाणी प्रश्न अद्याप सुटलेला नाही. त्र्यंबक परिसरातील हरसुल, गणेश नगर अशा अनेक भागांपैकी कोशीमपाडा एक. कोशीमपाड्याची लोकसंख्या ५०० आहे. गावात पाण्यासाठी विहीर आहे. हिवाळ्यातच विहिरीने तळ गाठल्याने पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे. कोशिमपाडाड्यात ७० पेक्षा जास्त आदिवासी कुटुंबे आहेत. या ठिकाणी पिण्यासाठी पाणी नसल्याने महिलांना विहिरीवर जाऊन गाळमिश्रित पाणी भरावे लागते. या ठिकाणी ना रस्ता ना पिण्यासाठी पाणी अशी अवस्था आहे.
हा पाडा जलजीवन मिशन योजनेत देखील समाविष्ट करण्यात आलेला नाही. ग्रामस्थ अशोक भोये यांनी कोशीमपाड्याची व्यथा मांडली. या ठिकाणी पावसाळा संपला की पाण्यासाठी भटंकती सुरू होते. गावापासून एक किलोमीटरवर असलेल्या विहिरीतुन पाणी आणण्यात येते. मात्र या पाण्यामुळे अनेकांना खोकला, उलटी असा त्रास होत आहे. गावाकडे येणाऱ्या जलवाहिनीचे पाईप कोणी फोडले आहे. याविषयी लोकप्रतिनिधी किंवा प्रशासन काहीही करत नसल्याची तक्रार भोये यांनी केली.
गावाकडे येण्यासाठी रस्ता नाही. ग्रामसेवक सुकदेव गांगुर्डे यांनी कमी दाबामुळे पाणी पुरवठा विभागाची मोटार जळाली होती. गाव घाट परिसरात वसले असल्याने कामास उशीर झाला. मात्र मोटार दुरूस्त झाल्याबरोबर गावातील विहिरीत पाणी सोडण्यात आल्याचे सांगितले. पाणी पुरवठा उपअभियंता यांनी प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन विहिरीची पाहणी केली आहे.

