नाशिक – सिंहस्थ कुंभमेळ्याची घटिका समीप येत असताना संथपणे सुरू असलेली विकासकामे युद्धपातळीवर पूर्ण करण्यासाठी त्र्यंबकेश्वर मंदिर दोन महिने भाविकांच्या दर्शनासाठी बंद ठेवण्याचा प्रस्ताव आहे. या कालावधीत मंदिरातील पूजा-अर्चा सुरू राहणार असून, भाविकांसाठी दर्शन तात्पुरते बंद असेल. यासंदर्भातील अंतिम तारीख विश्वस्त मंडळाच्या निर्णयानंतर निश्चित करण्यात येणार आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्याचा ध्वजारोहण सोहळा ३१ ऑक्टोबर रोजी होणार आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर येथे दर्शन पथ, अंतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण, कुशावर्तासह अन्य तीर्थ व प्राचीन मंदिरांचा जीर्णोद्धार, घाटांची उभारणी, फरशी बदलणे, गोदावरी प्रवाही करण्याची योजना, अशी एकाचवेळी अनेक कामे प्रगतीपथावर आहेत. दर्शन पथासाठी शासकीय इमारती जमीनदोस्त केल्या जात आहेत. अन्य कामांसाठी विविध रस्त्यांवर खोदकाम सुरू आहे.
भाविकांची मोठी गर्दी असल्याने या कामांमध्ये अडथळे येत असून, स्थानिकांनाही त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. कुशावर्त तीर्थ परिसरातील कामे ध्वजारोहणापूर्वी पूर्ण करणे आवश्यक असल्याने अलीकडेच हे तीर्थ ३१ ऑक्टोबरपर्यंत भाविकांसाठी बंद करण्यात आले आहे.
गुरुवारी नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी त्र्यंबकेश्वरमधील विकासकामांची पाहणी करून आढावा घेतला. यावेळी त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरातील विविध कामे भाविकांची मोठी वर्दळ असताना पूर्ण करणे अडचणीचे ठरत असल्याचा विषय पुढे आला. यासंदर्भात देवस्थानचे विश्वस्त आणि नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार यांच्याशी चर्चा करण्यात आली.
खोदकामांमुळे स्थानिकांना त्रास सहन करावा लागत असून, ही कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्यासाठी मंदिर काही कालावधीसाठी बंद ठेवण्याचा पर्याय सुचवण्यात आला. मंदिरातील दैनंदिन पूजा-अर्चा सुरू ठेवून भाविकांसाठी दर्शन तात्पुरते बंद ठेवण्याचा प्रस्ताव आहे. सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर दोन महिन्यांच्या कालावधीसाठी मंदिर बंद ठेवण्याचा विचार आहे. विश्वस्त मंडळाच्या निर्णयानंतर अंतिम तारीख निश्चित केली जाईल. भाविकांना या निर्णयाची पूर्वकल्पना दिली जाणार आहे.
युद्ध पातळीवर काम करण्याची तयारी
या कालावधीत संबंधित कामे दिवस-रात्र सुरू ठेवून निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. भाविकांची गैरसोय टाळणे आणि विकासकामे युद्धपातळीवर पूर्ण करण्यासाठी हा पर्याय निवडण्यात आला आहे. यासंदर्भात प्रशासन ठेकेदारांची बैठक घेणार आहे. त्र्यंबकेश्वरमधील विविध कामे अतिरिक्त मनुष्यबळ आणि वाढीव यंत्रसामग्रीच्या मदतीने निर्धारित वेळेत कशी पूर्ण करता येतील, याबाबत या बैठकीत चर्चा केली जाणार आहे.
