नाशिक – देशाच्या विविध भागातून तसेच परदेशातून येणार्‍या भाविकांना त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी रांगेत उभे राहण्याची वेळ येते. कधी कधी चार ते पाच तास त्यांचे रांगेतच जातात. शिवाय, त्र्यंबकेश्वर देवस्थानची दर्शन रांग मंदिराबाहेर गेल्यास भाविकांचे अधिक हाल होतात. कधी कडक उन्हात तर कधी पावसाच्या सरी झेलत त्यांना रांगेत उभे राहावे लागते. भाविकांची ही अगतिकता लक्षात घेऊन अधिकाचे पैसे घेऊन भाविकांना मंदिरात दर्शनासाठी सोडत असल्याचे उघड झाले. त्यामुळे आता श्री त्र्यंबकेश्वर देवस्थानाने एक वेगळीच युक्ती काढली आहे.

भाविकांना त्र्यंबकेश्वर दर्शनाचे तीन हजार रुपये घेऊन दर्शन घडविणारा प्रकार उघड झाल्यानंतर वाद उदभवला. विशेष म्हणजे त्यात देवस्थानचा विश्वस्तही अडकल्याने अधिकच चर्चा झाली. आता त्र्यंबकेश्वर देवस्थाननेच आपली स्वत:ची एक योजना सुरु करण्याचे ठरविले आहे. श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान विश्वस्त मंडळाने दर्शन तिकिटाचा काळा बाजार रोखण्यासाठी ‘ब्रेक दर्शन’योजना आखली आहे. ही योजना लवकरच सुरू होणार आहे. या नवीन योजनेसह २०० रुपयांची देणगी दर्शन योजना देखील सुरू राहणार आहे.

त्र्यंबकेश्वर मंदिर धर्म दर्शन मोफत रांगेत आणि २०० रुपये देणगी दर्शन रांगेत भाविकांची कायमच मोठी गर्दी असते. धर्म दर्शन रांगेत सर्वसामान्य भाविक अधिक राहात असल्याने दर्शनासाठी त्यांना जास्त वेळ लागतो. संबंधित दोन्ही रांगा त्र्यंबकेश्वराच्या मुख्य मंदिरात एकत्र येतात. अडीच हजाराचे तिकीट घेणार्‍या दर्शनार्थीला या दोन्हीचा संगम होणारी रांग थांबवून ‘ब्रेक’ देऊन दर्शन घडवण्यात येईल. त्यासाठी रांग पाच मिनिटांसाठी दर एक तासाने थांबवण्यात येईल. तिकीट घेऊन दर्शन घेतलेले भाविक आठ मिनिटात बाहेर पडतील. यासाठी स्वतंत्र काउंटर उघडले जाणार आहे.

पुढील काही दिवसांत या योजनेची अंमलबजावणी होण्याची शक्यता असून, अधिकृत तिकीट पद्धतीमुळे दलालांमार्फत होणारी आर्थिक लूट थांबेल, असा विश्वास विश्वस्त मंडळाने व्यक्त केला आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरात पहाटे ५ ते रात्री ९ ही वेळ दर्शनासाठी असते. सद्यस्थितीत मंदिराच्या पूर्व दरवाजाने मोफत रांग आणि उत्तर दरवाजाने २०० रूपयांच्या देणगी दर्शनाची रांग अशा दोन व्यवस्था आहेत. या दोन्ही रांगा नंदी मंदिराजवळ एकत्र होतात. २०० रूपयांच्या रांगेतील भाविकांना सभामंडपाच्या उत्तर बाजूने पुढे सोडले जात असल्याने त्यांना तुलनेने जलद दर्शन मिळते. नव्या ‘ ब्रेक दर्शन ‘ व्यवस्थेनुसार दर्शनाच्या वेळेत प्रत्येक तासाला पाच मिनिटांचा ब्रेक देण्यात येणार आहे.

सध्या बाहेरील दलाल २०० रुपयांचे तिकीट काढून भाविकांकडून हजारो रुपये घेत त्यांंची लूट करतात. आणि त्यांना सामान्य तिकीट रांगेतच सोडतात. अथवा ओळखीतून जाळीच्या गेटमधून प्रवेश मिळवून देतात. अधिकृत २५०० रुपयांची पावती सुरू झाल्यास मध्यस्थ दलालांकडून होणारी फसवणूक कमी होईल, असा दावा विश्वस्त मंडळाने केला आहे. विश्वस्त सत्यप्रिय शुक्ल यांच्या म्हणण्यानुसार, भाविकांची होणारी लुबाडणूक ब्रेक दर्शन व्यवस्थेने टळू शकेल. त्यासाठी देवस्थान ट्रस्टने अधिकृत २५०० रुपये आकारून ब्रेक दर्शनाची सुविधा निश्चित केली आहे.