नाशिक – बारा ज्योर्तिलिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिराच्या आवारातील शिलालेखावरून भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग आणि त्र्यंबकेश्वर मंदिर देवस्थान विश्वस्त यांच्यातील मतभेद कायम आहेत. पुरातत्व विभागाने बसवलेल्या शिलालेखावर हे मंदिर तृतीय पेशवा बाळाजी बाजीराव यांनी बांधल्याचा आणि मंदिराचा जीर्णोद्धार अहिल्याबाई होळकर यांनी केल्याचा उल्लेख आहे. मंदिराच्या जीर्णोद्धाराशी अहिल्याबाई होळकर यांचा संबंध नसल्याचे काही विश्वस्तांचे म्हणणे आहे. या शिलालेखामुळे चुकीची माहिती भाविकांपर्यंत जात असल्याने कुंभमेळ्यापूर्वी त्यात दुरुस्ती करण्याची मागणी विश्वस्तांनी केली आहे. पुरातत्व विभागाने सर्व आक्षेप फेटाळले आहेत.
त्र्यंबकेश्वर मंदिर हे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या अखत्यारीत आहे. काही वर्षांपूर्वी या विभागाने मंदिराची माहिती भाविकांना समजण्यासाठी उत्तर महाद्वाराच्या आतील बाजुला शिलालेख बसवला. त्यावर मंदिराचा जीर्णोद्धार अहिल्याबाई होळकर यांनी केल्याचा उल्लेख आहे. या संदर्भात त्र्यंबकेश्वर देवस्थानने माहिती अधिकार कायद्यातंर्गत विचारणा केली होती. तेव्हा पुरातत्व विभागाने ज्या पुस्तकाचा संदर्भ दिला, त्यात अहिल्याबाई होळकर यांच्याशी संबंधित कुठेही उल्लेख सापडला नसल्याने देवस्थानने पत्राद्वारे निदर्शनास आणून दिले होते.
‘गॅझेटिअर ऑफ द मुंबई प्रसिटेन्सी १६, नाशिक सन १८८३’ साली प्रकाशित झालेल्या गॅझेटमध्ये त्र्यंबकेश्वर मंदिराचे निर्माण हे श्रीमंत पेशवा बाळाजी बाजीराव यांनी केल्याचा स्पष्ट उल्लेख आहे. यासंदर्भातील प्रतही विश्वस्तांकडून सादर करण्यात आली होती. भारतीय पुरातत्व विभागाने शिलालेखावर दिलेल्या माहितीमुळे मंदिराच्या इतिहासाची चुकीची माहिती भाविकांपर्यंत पोहोचत आहे. भाविकांची दिशाभूल न करता संबंधित शिलालेखात तात्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी करूनही पुरातत्व विभागाने आजवर त्याकडे पूर्णत: दुर्लक्ष केल्याचे विश्वस्तांचे म्हणणे आहे.
देवस्थानची माहिती
सध्याचे त्र्यंबकेश्वर मंदिर हे तिसरे पेशवे बाळाजी बाजीराव (१७४०-१७६०) यांनी एका जुन्या मंदिराच्या जागेवर बांधले. देवस्थानच्या संकेतस्थळावर हाच इतिहास आहे. या मंदिराचे उद्घाटन १६ फेब्रुवारी १७५६ रोजी, महाशिवरात्रीच्या दिवशी झाले. मंदिर जीर्णोद्धाराशी संबंधित कुठलाही उल्लेख या संकेतस्थळावर नाही.
पुरातत्वकडून शहानिशा न करता उल्लेख
श्री. त्र्यंबकेश्वर मंदिराबाबत पुरातत्व सर्वेक्षण विभागाची कार्यपद्धती अनाकलनीय आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर या वंदनीय प्रार्थनीय आहेतच, यात शंका नाही. परंतु, त्र्यंबकेश्वर मंदिर हे पेशव्यांनी बांधलेले आहे. (सन १७५५ ते सन १७८६) या बाबतचे सर्व पुरावे उपलब्ध आहेत. (किती खर्च झाला, कोणाच्या देखरेखीखाली बांधकाम झाले इत्यादी) मात्र पुरातत्व खात्याने कसलीही शहानिशा केलेली दिसत नाही. तसेच त्यांनी दिलेले आधार तपासले असता त्यातही काहीच माहिती उपलब्ध नाही. याबाबत देवस्थानने वेळोवेळी पत्रव्यवहार करून सत्य मांडण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याकडून पटांगणात दिशाभूल करणारा फलक लावला आहे. त्यात तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी. सत्य शिलालेख लावावा.- डॉ. सत्यप्रिय शुक्ल (विश्वस्त तथा त्रिकाल पूजक, त्र्यंबकेश्वर मंदिर देवस्थान)
विश्वस्तांचे आक्षेप अयोग्य
भारतीय पुरातत्व सर्वेक्षण ही या देशातील सर्वोच्च संस्था आहे. या संस्थेकडून भारताच्या इतिहासाविषयी व संस्कृतीबद्दल शिलालेखावर दिली जाणारी ऐतिहासिक माहिती पूर्णपणे प्रामाणिक व विश्वसनीय असते. पडताळणी करून ती दिली जाते. त्यामुळे त्र्यंबकेश्वर मंदिरातील शिलालेखावर दिलेल्या माहितीवर घेतले जाणारे आक्षेप योग्य नाहीत.- अरूण मलिक ( सुपरिटेंडिंग आर्किऑलॉजिस्ट, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण, छत्रपती संभाजीनगर)
