नाशिक – दर्शनाच्या नावाखाली होणारा काळाबाजार रोखण्यासाठी त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या वतीने शीघ्र दर्शन व्यवस्था सुरू करण्यात आली. यासाठी अडीच हजार रुपये दर ठरविण्यात आला असून पहिल्याच दिवशी ३० हून अधिक भाविकांनी या सुविधेचा लाभ घेतला. प्रायोगिक तत्वावर हा उपक्रम सुरू असल्याची माहिती देवस्थानच्या वतीने देण्यात आली.
बारा ज्योर्तिलिंगापैकी एक श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे पूजा विधी तसेच कुशावर्त स्नान, त्र्यंबकराजाचे दर्शन यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. दर्शनासाठी होणारी गर्दी ही येथील अर्थकारणाचा केंद्रबिंदु आहे, बऱ्याचदा भाविकांकडून येथील गर्दी पाहता काही वेगळ्या मार्गाने दर्शन घेता येईल का, याची चाचपणी करण्यात येते. यामध्ये स्थानिक हॉटेल व्यावसायिक, देवस्थानचे काही विश्वस्थ, कर्मचारी यांचा सहभाग राहिला आहे. या पध्दतीने भाविकांना लुटणारी स्वतंत्र साखळी तयार झाली. एका तिकीटासाठी भाविकांना चार ते पाच हजार रुपयांना लुटण्यात आले. ऑनलाईन देणगी दर्शनातही विश्वस्थांच्या तसेच कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून घोळ घालत भाविकांची लुट होत राहिली. या प्रकरणात देवस्थानचे विश्वस्त पुरूषोत्तम कडलग हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. दर्शनाच्या नावे होणाऱ्या काळाबाजाराला चाप बसावा, यासाठी देवस्थानच्या वतीने प्रायोगिक तत्वावर अडीच हजार रुपये दर्शन तिकीट ठरविण्यात आले आहे. याबाबत मागील काही बैठकींमध्ये ठराव करण्यात आला होता. यानुसार गुरूवारी जलद देणगी दर्शन व्यवस्थेला सुरूवात झाली.
यासाठी कुठलाही मध्यस्थ न ठेवता देवस्थानच्या प्रवेशद्वारावर फलक लावण्यात आला आहे. या ठिकाणी एका कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. जलद देणगी दर्शनाविषयी विचारणा केल्यास त्याला देवस्थान कर्मचाऱ्याकडे नेले जाते. त्याचे आधारकार्ड पाहून तिकीट दिले जात आहे.
या उपक्रमाविषयी स्थानिक पातळीवर नाराजी व्यक्त करण्यात येत असली तरी देवस्थान आपल्या भूमिकेवर ठाम आहे. याविषयी विश्वस्त कैलास घुले यांनी समर्थन केले. काही वर्षांमध्ये देवस्थानात दर्शनाच्या नावाखाली सुरू असलेला गैरप्रकार समोर आला. आतापर्यंत पोलीस ठाण्यात याविषयी सात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या ठिकाणी दर्शनासाठी आलेला सधन भाविक हा वेळेत दर्शन करून पुढे जाण्यासाठी प्रयत्नशील असतो. या नादात काही वेळा गैरमार्गाचा अवलंब होतो. हे टाळण्यासाठी देवस्थानच्या वतीने अति जलद देणगी दर्शन व्यवस्था सुरू केली आहे. भाविकाने यातून तिकीट घेतले की ते त्याला अन्य लोकांसाठी वापरता येणार नाही. त्याच्या हातात तिकीट आल्यावर त्याला देवस्थानच्या गर्भगृहापर्यंत सोडण्याची व्यवस्था सुरक्षारक्षकाच्या मार्फत करण्यात आली आहे. या माध्यमातुन जमा होणाऱ्या निधीसाठी स्वतंत्र खाते खोलण्यात आले असून या निधीचा वापर कुंभपर्वात विविध कामांसाठी होणार असल्याचे घुले यांनी नमूद केले. पहिल्याच दिवशी २५ हून अधिक भाविकांनी या सेवेचा लाभ घेतला.
प्रायोगिक तत्वावर…
त्र्यंबकेश्वर येथील दर्शन व्यवस्था कायमच वादात राहिली आहे. देशाच्या विविध भागातून येणाऱ्या भाविकांना सोयीसुविधा मिळत नसताना त्यांची दर्शनाच्या नावाखाली होणारी लुबाडणूक कायमच चर्चेत राहिली आहे. गुरुवारपासून देवस्थानने नवीन शीघ्र दर्शन व्यवस्था प्रायोगिक तत्वावर सुरु केली आहे.
