नाशिक : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिराच्या जतनासाठी आवश्यक देखभाल-दुरुस्तीच्या कामांवरून श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (एएसआय) यांच्यातील मतभेद उघड झाले आहेत. देवस्थानकडून मंदिर आणि परिसरातील सुमारे ३६ दुरुस्ती कामांची यादी सादर करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याची तक्रार देवस्थानने केली आहे. दुसरीकडे, सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती कामे हाती घेण्यात आल्याचा दावा एएसआयकडून करण्यात आला आहे.

भूमिज आणि स्थानिक मराठा वास्तुशैलीचे मिश्रण असलेले त्र्यंबकेश्वर मंदिर १७४० ते १७६१ या कालावधीत बांधण्यात आले. मंदिराला भारतीय पुरातत्व सर्वेक्षणने १९५१ मध्ये राष्ट्रीय महत्त्वाचे स्मारक म्हणून घोषित केले. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मंदिरातील तातडीच्या दुरुस्ती कामांसाठी देवस्थानकडून पत्रव्यवहाराद्वारे पाठपुरावा केला जात आहे. मंदिरातील मूर्ती, कोरीव काम आणि वास्तुच्या जतनासाठी तातडीने कामे करण्याची आवश्यकता पत्रांमधून मांडण्यात आली. मुख्य गाभाऱ्याकडे जाणाऱ्या दगडी पायऱ्या ठिकठिकाणी तुटल्या आहेत. मंदिराच्या उत्तर नगारखान्यातील कमानीच्या खांबांना काही ठिकाणी भेगा पडल्या असून, या भागाची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली आहे. भाविक याच दरवाजातून मंदिरात प्रवेश करतात, याकडेही देवस्थानने लक्ष वेधले.

मंदिराच्या पूर्व नगारखान्याजवळील दीपमाळ अनेक ठिकाणी तुटली आहे.

मंदिराच्या आतील आणि बाहेरील दगडांचे सांधे भरण्याचे (पॉइंटिंग) काम करणे आवश्यक आहे. मंदिराच्या आतील भागात गळती होत असल्याने हे काम महत्त्वाचे असल्याचे सांगण्यात आले. मुख्य मंदिराच्या शिखराजवळील दगडांची दुरुस्ती तसेच मंदिरातील धोकादायक जुनी वायरिंग बदलण्याची मागणीही वारंवार करण्यात आल्याची माहिती देवस्थानचे विश्वस्त तथा त्रिकाल पूजक सत्यप्रिय शुक्ल यांनी दिली.

एएसआयकडून नाहक हस्तक्षेप

एकंदरीत ३६ कामांसाठी वारंवार पाठपुरावा करूनही भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाकडून प्रतिसाद मिळालेला नाही. ते स्वतः दुरुस्ती करीत नाहीत. आणि देवस्थानलाही स्वखर्चाने कामे करू देत नाही. देणग्या, अतिविशेष दर्शनाचे शुल्क आणि तत्सम प्रशासकीय बाबींमध्ये एएसआयकडून नाहक हस्तक्षेप होत असल्याचा आरोप विश्वस्त शुक्ल यांनी केला आहे.

गळती बंद करण्याचे काम पूर्ण; नगारखान्यांसाठी निविदा

देवस्थानच्या विश्वस्तांचे आक्षेप तथ्यहीन असल्याचे एएसआय, छत्रपती संभाजीनगर पुरातत्व मंडळाचे सुपरिटेंडिंग आर्किऑलॉजिस्ट डॉ. अरुण मलिक यांनी स्पष्ट केले. त्र्यंबकेश्वर मंदिराचे संरक्षण आणि संवर्धन करणे ही आमची जबाबदारी आहे. मंदिरातील गळती रोखण्याचे काम पूर्ण करण्यात आले असून रासायनिक प्रक्रियेचेही काम झाले आहे. अंतिम काम पूर्ण झाल्यानंतर मंदिराभोवतालची बांबूची रचना काढण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. उत्तर आणि पूर्व या दोन्ही नगारखान्यांच्या कामांसाठी निविदा काढण्यात येत आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त कामे करण्याचा प्रयत्न आहे, असेही त्यांनी सांगितले.

मंदिरावर लवकरच प्रकाशयोजना

एएसआय राष्ट्रीय संवर्धन धोरणानुसार काम करते. त्यामध्ये स्पष्ट निर्देश आहेत की, कालौघात एखादी मूर्ती भंगली असेल तर ती बदलता किंवा तिची दुरुस्ती करता येत नाही. मात्र मंदिराच्या वास्तूच्या रचनेशी संबंधित प्रश्न असल्यास त्याचे संवर्धन आणि जतन निश्चितपणे केले जाईल, असे सुपरिटेंडिंग आर्किऑलॉजिस्ट डॉ. अरुण मलिक यांनी सांगितले. मंदिरातील लटकणाऱ्या वायरी व्यवस्थित केल्या जातील. तसेच मंदिरावर ऐतिहासिक दिव्यांची प्रकाशयोजना करण्यात येणार आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण अतिशय चांगल्या प्रकारे काम करीत असून पुढील काळात ते सर्वांना दिसेल, असे मलिक यांनी नमूद केले.