नाशिक : बारा ज्योर्तिलिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरातील सुरक्षारक्षकांच्या कार्यपद्धतीविषयी कायमच ओरड होत असताना हरियाणातील एक भाविक आणि सुरक्षारक्षक यांच्यात धुमश्चक्री उडाल्याची बाब समोर आली. सुरक्षारक्षकांनी या भाविकाला कपडे फाटेपर्यंत मारहाण केल्याच्या चित्रफिती प्रसारित झाल्या. दुसरीकडे त्र्यंबकेश्वर मंदिरात सुरक्षारक्षकांनी भाविकाला मारहाण केली नसल्याचा दावा देवस्थानच्या विश्वस्तांनी केला. संबंधित भाविक अमली पदार्थाच्या नशेत होता. गाभाऱ्यात जाण्याचा त्याने प्रयत्न केला. यावेळी त्याला रोखताना झटापट झाली. त्याने देवस्थानच्या कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचे विश्वस्तांचे म्हणणे आहे.

सलग सुट्ट्यांमुळे त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी सध्या भाविकांची गर्दी उसळलेली आहे. भाविक आणि सुरक्षारक्षकांमध्ये यापूर्वी वादाचे प्रसंग उद्भवले आहेत. अशावेळी सुरक्षारक्षक एकत्र येऊन भाविकास मारहाण करतात, अशा तक्रारी अनेकदा केल्या जातात. रविवारी त्र्यंबकेश्वर मंदिरात पुन्हा त्याची पुनरावृत्ती झाल्याचे सांगितले जाते. हरियाणा येथील एक भाविक दर्शनासाठी आला होता. काही कारणावरून सुरक्षारक्षक आणि त्यांच्यात वाद होऊन झटापट झाली.

यावेळी सुरक्षारक्षकांनी त्यास लाथाबुक्यांनी मारहाण केल्याचे चित्रफितीत दिसते. संबंधित भाविकाने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याचे कपडे फाटले. या घटनेमुळे दर्शन रांगेतील भाविकांमध्ये अस्वस्थता पसरली. सुरक्षारक्षकांनी संबंधित भाविकाला मंदिराबाहेर नेले. या घटनाक्रमामुळे मंदिरातील सुरक्षारक्षकांची दादागिरी पुन्हा चर्चेत आली आहे.

दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना त्र्यंबकेश्वरमध्ये अनेक अडचणींना तोंंड द्यावे लागते. वाहन प्रवेश शुल्कापासून वाहनतळ, देणगी दर्शन, प्रसाधनगृह आदी व्यवस्थेत आर्थिक पिळवणूक होत असल्याची तक्रार मध्यंतरी गुजरातमधील भाविक कांजीभाई भरवाड यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली होती. सुरक्षारक्षकांकडून भाविकांना मारहाण झाल्याचे प्रकार घडले आहेत. रविवारच्या घटनेबाबत त्र्यंबकेश्वर देवस्थानचे विश्वस्त कैलास घुले यांनी स्पष्टीकरण दिले. सुरक्षारक्षकांनी भाविकाला मारहाण केल्याची तक्रार वस्तूस्थितीला धरून नाही. सकाळी पावणेसहा वाजता एका भाविकाने प्रवेश केला. दर्शन बारीत तो एक ते दीड तास बसला. गर्दीत अडथळा नको म्हणून सुरक्षारक्षकांनी त्याला दक्षिण द्वारला नेले. तिथे एक तास बसल्यानंतर त्याने आतमध्ये् प्रवेश करूत कपड्यांसह गाभाऱ्यात जाण्याचा आग्रह धरला. मुळात गाभाऱ्यात सोहळे नेसून विशिष्ट वेळेत परवानगी घेऊन जाता येते. भाविकाने आत जाण्याचा प्रयत्न केला असता सुरक्षारक्षकांनी त्याला रोखले. यामुळे संबंधिताने शिवीगाळ केली. यावेळी झटापट होऊन सुरक्षारक्षकांनी त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. देवस्थान मारहाणीचे समर्थन करत नाही. उलट भाविकाने आमच्या कर्मचाऱ्याला मारहाण केली. हरियाणा येथील हा भाविक अमली पदार्थाच्या नशेत गैरवर्तन करीत होता, असे विश्वस्तांचे म्हणणे आहे.

चौकशीचे आदेश

त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या राहणाऱ्या भाविकांना पाच ते सहा तास लागतात. दर्शनाची वेळ संपल्यावर चार ते पाच हजार भाविकांना दर्शन न घेता परतावे लागते. जे दर्शन रांगेत असतात, त्यांना सुरक्षारक्षकांचा जाच सहन करावा लागतो. भाविकाला मारहाणीच्या घटनेची गंभीर दखल जिल्हा प्रशासनाने घेतली आहे. या संपूर्ण प्रकरणाची न्यायदंडाधिकारी चौकशीचे आदेश देण्यात आल्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.