नाशिक – त्र्यंबकेश्वर मंदिरात सुरक्षारक्षकांनी हरियाणातील भाविकाला केलेल्या मारहाणीचे तीव्र पडसाद उमटले असून पोलिसांनी तीन ते चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. परराज्यातील भाविक मंदिरातील घटनाक्रमाने इतका भयभीत झाला की तो तक्रार न देताच निघून गेला. देशभरातून येणाऱ्या भाविकाला अशी मारहाण झाल्यास दर्शनाला कोण येईल, असा प्रश्न राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी केला.

कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी चार ते पाच सुरक्षारक्षकांनी एकत्रितपणे एखाद्या भाविकाला मारहाणीची घटना अक्षम्य गुन्हा असून असे प्रकार सहन केले जाणार नाहीत. त्यांचा अभ्यासवर्ग घेण्याची गरज असल्याचे नमूद केले आहे. पोलिसांनी संबंधितांना सक्त ताकीद देण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.

बारा ज्योर्तिलिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरात साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होते. रविवारी सुरक्षारक्षकांनी एका भाविकाला कपडे फाटेपर्यंत मारहाण केल्याचे समोर आले. मारहाणीच्या चित्रफिती समाजमाध्यमांवरून प्रसारित झाल्या असताना काही विश्वस्तांनी अशी मारहाण झाली नसल्याचा दावा केला होता. त्र्यंबकेश्वर मंदिरातील सुरक्षारक्षकांच्या दादागिरीचा अनेक भाविकांना फटका बसला आहे. भाविकांना मारहाणीचे प्रकार घडले आहेत. रविवारच्या घटनेची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी न्यायदंडाधिकारी चौकशीचे आदेश दिले. संबंधित भाविक तक्रार न देता निघून गेला होता. या प्रकरणात पोलीस शिपाई अमोल बोराडे यांनी तक्रार दिली. त्यावरून पप्पू आचारी, तुकाराम बुरुंगे यांच्यासह तीन ते चार सुरक्षारक्षकांविरुद्ध त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मारहाणीच्या घटनेवर भाविकांसह राजकीय वर्तुळातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. देशभरातून भाविक मंदिरात दर्शनासाठी येतात. त्यांना अशा प्रकारे मारहाण झाल्यास दर्शनासाठी कोण येईल असा प्रश्न मंत्री छगन भुजबळ यांनी उपस्थित केला. एखादा भाविक चुकीचा वागला असेल तर त्याला पोलिसांच्या ताब्यात द्यायला हवे. सुरक्षारक्षकांनी मारहाण केली तर नाव खराब होते, याकडे भुजबळ यांनी लक्ष वेधले.

कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी भाविकाला झालेली मारहाण हा गंभीर विषय असून अक्षम्य गुन्हा असल्याचे नमूद केले. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही विश्वस्तांनी संबंधित भाविकाने अमली पदार्थ सेवन केल्याचे म्हटले होते. त्यांनाही महाजन यांनी फटकारले. भाविक नशेत होता, हे तुम्ही कसे ठरवणार असे सुनावत भारतातून लोक दर्शनासाठी येतात, वारंवार असे प्रकार घडणे चुकीचे व अशोभनीय आहे. मंदिर व्यवस्थापनाला काही शंका आली तर त्यांनी भाविकाला पोलिसांच्या ताब्यात द्यायचे होते. मारहाणीचा प्रकार निंदनीय आहे. या संदर्भात मंदिर विश्वस्तांची लवकरच बैठक बोलावली जाईल. पोलिसांनी मंदिरातील सुरक्षारक्षकांचा अभ्यासवर्ग घेऊन कठोर ताकीद द्यावी. भाविकांना मारहाण कुठल्याही प्रकारे सहन केली जाणार नाही. मंदिरातील या व्यवस्थेत काय सुधारणा करता येतील याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली जाईल, असे महाजन यांनी नमूद केले.