नाशिक – पश्चिम बंगालच्या निवडणुकीत विशिष्ट पद्धतीने प्रचाराची धोरणे राबविली गेली. प्रशासकीय यंत्रणेचा प्रचंड हस्तक्षेप होता, अशी तक्रार तृणमूल काँग्रेसने केली आहे. यामध्ये अगदी ‘स्टाँग रुम’पासून ते इव्हीएमपर्यंत आणि अधिकारी कोण असावे, आदींचा समावेश आहे. त्यामुळे महाराष्ट्राप्रमाणे तेथील निवडणुकीत काही गडबड केली का, अशी चर्चा होत आहे. मतदारांमध्ये आपण दिलेले मत त्या उमेदवाराला मिळाले का, अशी शंका उपस्थित होत आहे, याकडे लक्ष वेधत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी निकाल हा निकाल असतो, तो मान्य करावा लागतो, असे नमूद केले.
राष्ट्रवादी शरद पवार गटातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक प्रदेशाध्यक्ष शिंदे यांच्या उपस्थितीत झाली. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी पश्चिम बंगाल निवडणुकीसह महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीतील निकालांवर भाष्य केले. तसेच त्र्यंबकेश्वर मंदिर व्हीआयपी दर्शन काळाबाजार प्रकरणी देवस्थानचा विश्वस्त तथा राष्ट्रवादी शरद पवार गटाचा राज्य कार्याध्यक्ष पुरूषोत्तम कडलग याच्यावर झालेल्या कारवाईबाबत भाष्य केले. बारामती विधानसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या मोठ्या मताधिक्याने निवडून येणार होत्या, यात शंका नव्हती. आमच्या पक्षाने निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून प्रयत्न केले. परंतु, काही अपक्ष उमेदवार रिंगणात राहिले. आमच्या पक्षाचे नेतेही प्रचारात होते. त्यांनी प्रामाणिकपणे प्रचार केल्यामुळे या प्रकारे सुनेत्रा पवार यांचा विजय झाल्याचे त्यांनी नमूद केले. राहुरीच्या निवडणुकीत पंचायत समितीचे माजी सदस्य असणाऱ्या गोविंद मोकाटे या सामान्य कार्यकर्त्याने चांगली लढत दिली. महायुती विरोधात आम्ही एकट्याने लढत देऊन ३५ हजारहून अधिक मते घेतली. लोकांच्या मनातील बदल हे चित्र दाखविण्यास पुरेसे असल्याचे शिंदे यांनी नमूद केले.
पक्षात गटबाजीला थारा नाही. कोणी गटबाजी करीत असेल तर त्याला बाहेरचा रस्ता दाखवला जाईल. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत बाहेरुन उमेदवार आयात करण्याऐवजी कार्यकर्त्यांना ताकद देण्याचा विचार पुढे आणला जात आहे. मध्यंतरी आमच्या महिला पदाधिकाऱ्याच्या घरावर हल्ला करण्यात आला. ॲट्रोसिटी विरोधी कायद्याचे खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. शरद पवार यांनी नाशिकचे पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षकांशी या संदर्भात चर्चा केल्याकडे शिंदे यांनी लक्ष वेधले. पक्ष, संपूर्ण जिल्हा प्रत्येक कार्यकर्त्यांच्या पाठिशी उभा राहील, असे त्यांंनी सूचित केले.
..तर पक्षाचे कडलग यांना सहकार्य
त्र्यंबकेश्वर मंदिर व्हीआयपी दर्शन काळाबाजार प्रकरणी देवस्थानचा विश्वस्त तथा राष्ट्रवादी शरद पवार गटाचा राज्य कार्याध्यक्ष पुरूषोत्तम कडलग याच्यावर झालेल्या कारवाईबाबत प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी भाष्य केले. या संदर्भात पक्षाच्या माध्यमातून आम्ही सुरुवातीला माहिती घेतली होती. यात राजकीय सुडापोटी, राजकीय द्वेषापोटी राजकारण झाले असेल तर पक्षाची त्यांच्याशी सहकार्याची भूमिका असेल. कडलग यांची चूक झाली असेल तर पक्ष याबाबत विचार करेल. विश्वस्त कडलग यांच्यावर राजकीय सुडापोटी जाणीवपूर्वक कारवाई झाल्याची चर्चा आहे. यासंदर्भात माहिती घेऊन विचार केला जाईल. राज्यात इतक्या घटना घडतात, तिथे पोलीस तत्परता दाखवत नाही. दुसरीकडे राजकीय दबावासाठी यंत्रणेचा वापर केला जातो, असा आरोप शिंदे यांनी केला.
