नाशिक – त्र्यंबकेश्वर मंदिरात संशयितांच्या सांगण्यावरून अनेक भाविकांना सोडण्यात आले होते. त्या चार दिवसात ७१ भाविक असे होते की, ते दर्शनाला आतमध्ये कसे गेले, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. यामध्ये काही परराज्यातील भाविकांचाही समावेश आहे.
या भाविकांनाही पैसे घेऊन व्हीआयपी दर्शन घडवले गेल्याची साशंकता आहे. या दिशेने यंत्रणा आता तपास करणार आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित त्र्यंबकेश्वर देवस्थानचा विश्वस्त तथा राष्ट्रवादी शरद पवार गटाचा राज्य कार्याध्यक्ष पुरुषोत्तम कडलग याच्यासह दोघांच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने २४ एप्रिलपर्यंत वाढ केली आहे.
बारा ज्योर्तिलिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरात व्हीआयपी दर्शनाच्या नावाखाली होत असलेल्या काळ्या बाजार प्रकरणी पोलिसांनी त्र्यंबकेश्वर देवस्थानचा विश्वस्त कडलग याला अटक केली. अल्पावधीत दर्शन करून देण्याच्या नावाखाली भाविकांची फसवणूक केल्या प्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात गोटीराम पेहरे आणि अभिषेक कडलग या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल आहे.
संशयित अभिषेक हा त्र्यंबकेश्वर देवस्थानचा विश्वस्त पुरूषोत्तम कडलग यांचा पुतण्या आहे. संशयित अभिषेक आणि त्याचा भाऊ ओम कडलग यांच्यामार्फत व्हीआयपी दर्शनाचा काळा बाजार सुरू होता. भाविकांकडून दोन ते सहा हजार रुपयांपर्यंत पैसे घेतले जात होते. या प्रकरणात संशयित विश्वस्त पुरूषोत्तम आणि गोटीराम यांच्या पोलीस कोठडीची मुदत संपुष्टात आल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले.
ज्या चार दिवसांत व्हीआयपी दर्शनाच्या नावाखाली भाविकांची फसवणूक झाल्याचे समोर आले, त्या काळात मंदिरात थेट दर्शनाला गेलेल्या भाविकांची पोलिसांनी पडताळणी केली. संशयिताच्या सांगण्यावरून काही भाविक थेट दर्शनाला गेले. परंतु, ७१ असे भाविक होते की ते दर्शनाला कसे गेले, याबाबत संशयितांना काही सांगता आलेले नाही. यात काही परराज्यातील भाविक आहेत. त्यांच्याकडून पैसे घेऊन दर्शनाला सोडले गेल्याचा पोलिसांना संशय आहे.
कडलगच्या बँक खात्यावर एक कोटी १३ लाख रुपयांची एट्री आहे. हे पैसे भाविकांकडून घेतले की आणखी कोणाकडून या संदर्भात सखोल तपास करण्यासाठी संशयितांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी सरकारी पक्षाच्यावतीने करण्यात आली. संशयिताच्या बँक खात्यातील आर्थिक व्यवहारांची माहिती घेतली जाणार आहे.
न्यायालयाने संशयित विश्वस्त कडलग आणि पेहरे यांची २४ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली. या बाबतची माहिती त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याचे निरीक्षक महेश कुलकर्णी यांनी दिली.
